८ जूनला पार पडणार मोदींचा शपथविधी सोहळा?
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं आहे, मात्र बहुमत एनडीएला मिळालं आहे. अशातच नरेंद्र मोदी हे सरकार स्थापन करणार आणि ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील अशी शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर त्यांच्यावर नवा विक्रम नोंदवला जाईल. सलग तीनदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा विक्रम हा पंडीत नेहरुंच्या नावावर होता. ज्यानंतर मोदी हे त्या विक्रमाशी बरोबरी करु शकतात. आज दुपारी ४ वाजता एनडीएची बैठक बोलवण्यात आली आहे. टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू, जदयू चे प्रमुख नितीश कुमार आणि इतर घटक पक्ष सहभागी होणार आहेत. एनडीएच्या घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतर भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक होईल. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि नरेंद्र मोदींचा शपथविधी याबाबत चर्चा होईल.
जदयूचे नेते नितीश कुमार बुधवारी सकाळी दिल्लीत पोहचले आहेत. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशात मोदींचा शपथविधी ८ जून रोजी असू शकतो अशी माहिती समोर आली आहे. चंद्रबाबू नायडूही अगदी काही वेळात दिल्लीत पोहचणार आहेत. २०१४ मध्ये एनडीएसह भाजपाचं सरकार आलं तेव्हा १० दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. तर २०१९ च्या निकालानंतर सात दिवसांनी शपथविधी सोहळा पार पडला होता. आता यावेळी ८ जून रोजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ घेण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएने भाजपासह २९३ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. त्यांचे सात अपक्ष उमेदवारीही निवडून आले आहेत. आज संध्याकाळी इंडिया आघाडीचीही बैठक दिल्लीत पार पडते आहे. या बैठकीनंतर त्यांची पुढची रणनीती काय हे समोर येणार आहे.