‘पोर्तुगिजांनी गोव्याला लुटले, हीच वस्तुस्थिती!’
म्हापसा:
श्रीमंत गोव्याला पोर्तुगिजांनी तब्बल 450वर्षे लुटले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. हा संघर्ष नव्या पिढीला माहित व्हावा यासाठी आग्वाद कारागृहात या संबंधीचे भव्य प्रदर्शन उभारण्यात येत आहे. देशाच्या अमृत महोत्सवनिमित्त संपूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी हे आग्वाद कारागृह वस्तुसंग्रहालय मोफत खुले ठेवले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली.
‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले. यात अनेकांना आग्वाद कारागृहात बंदिस्त ठेवण्यात आलेले. अशावेळी या हुतात्म्यांना श्रद्धाजंली वाहत, या कारागृहाचा वारसा तसेच मुक्ती लढ्याचे ऐतिहासिक वर्णन करणारे वस्तुसंग्रहालय इथे उभे राहत आहे. येत्या १ सप्टेंबरला याचे लोकार्पण होणार’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गुरुवारी (ता.११) सायंकाळी ‘आझादी का अमृत महोत्सव’निमित्त सिकेरी येथील किल्ला आग्वाद कारागृहावर आयोजित ध्वजारोहण व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी विरोधी पक्षनेता मायकल लोबो, मंत्री रोहन खवंटे, पोलीस महासंचालक जसपाल सिंह, आमदार गणेश गावकर हे व्यासपीठावर हजर होते. यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राया शिरोडकर (बिठ्ठोणा), श्यामसुंदर कळंगुटकर (पर्वरी), प्रभाकर नाईक (कासरपाल), सान्ताना डायस (कळंगुट), रोहिदास देसाई (पणजी) या स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, अमृत महोत्सवनिमित्त सरकारने काही संकल्प केले आहेत. याअंतर्गत, शाळकरी विद्यार्थी तसेच युवकांनी देशाच्या पुढील २५ वर्षांसाठी पंचाहत्तर अशी नवीन कल्पना, ठराव, क्रिया व उपलब्धी सूचवावी. आता देशासाठी प्राण देण्याची गरज नसून, नवीन कल्पना मांडण्याची गरज आहे.