
२०११ मध्ये दिगंबर कामतांनी म्हादई व्याघ्रक्षेत्र का अधिसुचीत केले नाही? – मडगावचो आवाज
मडगाव: म्हादई वन्यजीव अभयारण्याला टायगर रिझर्व्ह घोषित करण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (सिईसी) गोव्यात दाखल झाली असताना, मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्या भाजपमध्ये गेलेले माजी कॉंग्रेस आमदार व मंत्री दिगंबर कामत यांच्यावर २०११ मध्ये या प्रस्तावावर कार्यवाही न केल्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रभव नायक यांनी नमूद केले की, २०११ मध्ये तत्कालीन केंद्रिय पर्यावरण आणि वनमंत्री जयराम रमेश यांनी गोवा सरकारसमोर म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. वैज्ञानिक अभ्यास आणि क्षेत्रीय पुराव्यांनुसार गोव्यातील वाघ हे फक्त प्रवासी नाहीत, तर स्थानिक वाघसंख्या आहे, हे स्पष्ट झाले होते. तरीही, तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हा प्रस्ताव पुढे नेण्यास विलंब केला, असा गंभीर आरोप प्रभव नायक यांनी केला आहे.
सिईसीच्या भेटीचे स्वागत करताना प्रभव नायक यांनी आशा व्यक्त केली की, या समितीच्या निष्कर्षांमुळे आई म्हादई आणि गोव्याच्या समृद्ध नैसर्गिक वारशाला शेवटी न्याय मिळेल. “म्हादई टायगर रिझर्व्ह हा फक्त वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा नाही, तर गोव्याची ओळख जपण्याचा आणि भावी पिढ्यांचे रक्षण करण्याचा विषय आहे,” असे त्यांनी प्रभव नायक यांनी सांगितले.
नायक यांनी पुढे सांगितले की म्हादई वन्यजीव अभयारण्य हे गोव्याच्या जंगलांना भिमगड वन्यजीव अभयारण्य आणि कर्नाटकातील अणशी-दांडेली टायगर रिझर्व्ह यांच्याशी जोडणाऱ्या विस्तृत वाघांच्या अधिवासाचा महत्त्वाचा भाग आहे. “गोव्याची अरण्ये हा एक अमूल्य नैसर्गिक ठेवा आहे. त्यावेळच्या सरकारने वेळेवर निर्णय घेतला असता, तर म्हादईला दहा वर्षांपूर्वीच टायगर रिझर्व्हचा दर्जा मिळाला असता,” असा दावा प्रभव नायक यांनी केला.
भारतीय वन्यजीव संस्थेच्या २००८ च्या अभ्यासाचा उल्लेख करत नायक म्हणाले की, या अहवालात गोव्याच्या संरक्षित भागांना आणि शेजारील अरण्यांना पश्चिम घाटातील सर्वोत्तम संभाव्य वाघ अधिवास म्हणून नमूद गेले होते आणि तातडीने संरक्षणाची गरज असल्याचे सांगितले होते. “तो अहवाल हा एक इशारा होता, पण त्यावेळच्या आणि आताच्याही सत्ताधाऱ्यांनी तो दुर्लक्षित केला,” अशी टीका त्यांनी केली.
म्हादई टायगर रिझर्व्हसाठी स्थानिक जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात आहे. या रिझर्व्हमुळे आई म्हादई नदी आणि जैवविविधतेचे संरक्षण होण्यासोबतच शाश्वत पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. “पर्यावरण संरक्षण आणि समाजकल्याण हे एकत्र साध्य होऊ शकते, फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे,” असे प्रभव नायक म्हणाले.