गोव्यातील नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींबद्दल प्रभव नायक यांचे पंतप्रधानाना निवेदन
मडगाव: मडगांवचो अवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर निवेदन सादर करून गोव्यात वाढत चाललेल्या अपघात, दुर्घटना आणि सुरक्षा-संबंधित त्रुटीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या पत्रामध्ये वारंवार होणाऱ्या घटनांचा उल्लेख आहे. जंगलात लागलेली भयानक आग, इंधन पाईपलाईन गळती, कारखान्यांतील व स्क्रॅपयार्डमधील आग, फेरीबोटीला मिळालेली जलसमाधी, इस्त्रोने दर्शवलेले भूस्खलन प्रवण भाग व किनारपट्टीचे झिज, शिरगाव जत्रेतील चेंगराचेंगरी व मृत्यू आणि नुकत्याच घडलेल्या नाईट क्लबमधील भीषण आगीत २५ निर्दोष लोकांचा झालेला मृत्यू या गंभीर घटनांचा बोध घेवून सरकारकडून काय पाऊले उचलली गेली याबाबत अद्याप पारदर्शकता दिसून येत नाही, असे प्रभव नायक यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रात भारताच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांनी नाईट-क्लब दुर्घटनेतील पीडितांना जाहीर केलेल्या तात्काळ मदतीचे कौतुक करण्यात आले आहे. मात्र, केवळ दिलासा पुरेसा नसून सरकारने जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. निष्काळजीपणा, सुरक्षानियमांचे उल्लंघन किंवा अंमलबजावणीतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे प्रभव नायक यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
नाईट-क्लबमधील आगीने पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन कृतीदलातील भीषण त्रुटी उघड केल्या आहेत. प्रशासकीय दुर्लक्ष आणि अंमलबजावणी दलाची कमतरता यांचे हे लक्षण असल्याचा इशारा नायक यांनी दिला आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्यक्रमांमधील वारंवार होणाऱ्या आगींच्या घटनांबाबतही पत्रात गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काल कला अकादमीतील सरेंडिपिटी फेस्टिव्हलच्या मंडपाला वेल्डींगचे काम चालू असल्याने आग लागल्याचा संशय असून, गेल्या वर्षी त्याच फेस्टिव्हलच्या आयननॉक्स कोर्टयार्डमधील मंडपाला अशाच प्रकारे लागलेली आग होती यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अशा सलग घडणाऱ्या चुका पाहता, “सरकार व प्रशासनाने धडा अजिबात घेतला नाही” हे स्पष्ट होते, असे प्रभव नायकांनी नमूद केले आहे.
या सातत्याने घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, प्रभव नायक यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान किंवा माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करून गोव्याच्या सुरक्षा नियमांचे, अंमलबजावणी यंत्रणेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचे सर्वंकष परीक्षण करण्याची विनंती केली आहे. निष्पक्ष व अधिकारपूर्ण चौकशी हीच जनतेचा विश्वास परत मिळवण्याची आणि दीर्घकालीन सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता असल्याचे, प्रभव नायक यांनी आपल्या पत्रात म्हटसे आहे.
आजचा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस असल्याचे पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात नोंद करत, शासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि शुचितेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा दिवस आहे असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे. “गोव्याच्या जनतेला त्यांच्या सुरक्षिततेचा, जबाबदारीचा आणि संरक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेपाची विनंती केली आहे,” असे प्रभव नायक यांनी शेवटी पत्रात नमूद केले आहे.



