म्हादई व्याघ्र प्रकल्प अधिसूचना न काढण्यास ‘हे’ आहेत जबाबदार : प्रभव नायक
मडगाव : “१ एप्रिल १९७३ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुरू केलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ हा भारताच्या राष्ट्रीय प्राण्याच्या संरक्षणासाठी दूरदृष्टीचा निर्णय होता. २८ जून २०११ रोजी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री जयराम रमेश यांनी म्हादई अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केले होते, मात्र त्यावेळचे गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कोणतीही कारवाई केली नाही,” असा आरोप मडगावचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.
तत्कालीन केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी दिगंबर कामत यांना पाठवलेल्या पत्राची प्रत दाखवत प्रभव नायक यांनी सांगितले की, म्हादईला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला असता तर कर्नाटक कडून म्हादई नदीच्या पाणी वळवण्याच्या प्रयत्नांना चपराख बसली असती.
म्हादई पाणीतंटा वादाच्या पार्श्वभूमीवर सदर संधी गमावल्याचे दूरगामी परिणाम झाले आहेत असा दावा करत., ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत मिळणारे पर्यावरणीय संरक्षण हे केवळ वन्यजीवांसाठीच नव्हे तर गोव्याच्या जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीसाठीही एक कठोर कायदेशीर व पर्यावरणीय संरक्षण कवच ठरले असते, असे प्रभव नायक यांनी नमूद केले.
प्रभव नायक पुढे म्हणाले, “म्हादईला त्यावेळीच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला असता तर वन्यजीव संरक्षण अधिक बळकट झाले असते, तसेच पर्यटन आणि स्थानिकांसाठी शाश्वत विकासाच्या संधीही निर्माण झाल्या असत्या.”
मडगावचो आवाजने या गंभीर दुर्लक्षाचा तीव्र निषेध करत सध्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून त्या वेळी कारवाई का झाली नाही याबाबत स्पष्ट स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच त्यांनी त्या वेळी आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक मौन बाळगले होते का, असा सवाल उपस्थित करत गोमंतकीय जनतेला या गंभीर विषयावर उत्तर मिळायलाच हवे, अशी मागणी केली आहे.

