पुंडलिक नायक यांना विमला वी पै जीवनसिद्धी सन्मान प्रदान
पणजी:
कोंकणी साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी आजतागायत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल प्रसिद्ध नाटककार आणि साहित्यिक पुंडलिक नायक यांना श्रीमती विमला व्ही. पै जीवन-सिद्धी सन्मान प्रदान करण्यात आला.
१ नोव्हेंबर रोजी मंगळूर येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाला पुंडलिक नायक उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे विश्व कोकणी केंद्राचे अध्यक्ष नंदगोपाल शेणॉय यांच्या सुचवणेनुसार उपाध्यक्ष डॉ. किरण बुडकुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात पुंडलिक नायक यांना त्यांच्या वळवई येथील निवासस्थानी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, हार, सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी विश्व कोकणी केंद्राच्या उपाध्यक्ष डॉ. किरण बुडकुले, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक आणि कलाकार श्रीधर कामत बांबोळकर, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका हेमा नायक, कवी उदय म्हांब्रो, हरेकल पुंडलिक पै आणि कवयित्री नूतन साखरदांडे उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी ५५५ दिवसांचे राजभास आंदोलन आणि कोकणी भाषेतील एकूण चळवळीतील पुंडलिक नायक यांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकला. कोकणीला गोव्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळावी, यासाठीच्या यशस्वी चळवळीत कोकणी लोकांच्या आवाजाचे शाश्वत नेतृत्व हे त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे यावे नमूद करण्यात आले. कोकणी साहित्य चळवळीत सर्व स्तरातील कोकणी तरुणांना सहभागी करून त्यांनी प्रतिभावान तरुणांची ताकद निर्माण केल्याचे किरण बुडकुले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, नुकतेच निधन पावलेल्या ज्येष्ठ कोकणी कवी अशोक भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कवी उदय म्हांब्रो यांनी यांनी अशोक भोसले यांचे कोंकणी साहित्य आणि चळवळीतील योगदानावर विशेष भाष्य केले.
युगांक नायक यांनी स्वागत केले. उदय म्हांब्रो यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीधर कामत बांबोळकर यांनी पुंडलिक नायक यांच्या लेखन आणि नाट्य चळवळीतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी डॉ. जयंत बुडकुले, गीता कामत बांबोळकर तसेच राजेंद्र नायक, महादेव नायक, हिरू नायक, सुकांती नायक, श्रीकांत नायक आणि बाबा प्रसाद उपस्थित होते.
सन्मानाला प्रतिसाद देताना पुंडलिक नायक यांनी त्यांच्या भूतकाळातील आठवणी सांगितल्या. आपण कधीही पुरस्कारांच्या मागे गेलो नाही तर, पुरस्कार आपल्यापर्यंत सहज पोहोचले, असे सांगत जीवन सिद्धी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी विश्व कोकणी केंद्राचे आभार मानले.


