पणजी :
गोवा प्रदेश काँग्रेस समितीने कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या ऐतिहासीक ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे अभिनंदन केले आहे.
एकतेचा संदेश देणारा ही ऐतिहासिक यात्रा देशात “परिवर्तनाची लाट” घेऊन येणार आहे. राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी यात्रेच्या प्रारंभी नागरिकांना दिलेले वचन पाळले व श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला, असे ११६ दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपासाठी श्रीनगरमध्ये उपस्थित असलेले काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
‘एक भारत, एकसंघ भारत’चा संदेश देत भारताचा तिरंगा कन्याकुमारीहून काश्मीरपर्यंत पोहोचला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची व राहुल गांधींसोबत चालण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.
या ऐतिहासिक “भारत जोडो यात्रेने” देशाचे नेते राहुल गांधी यांना कन्याकुमारी ते काश्मीरमधील लोकांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची संधी दिली, असे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरैरा यांनी सांगितले.
७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या यात्रेत राजस्थानमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. माझ्यासाठी हा अद्भूत अनुभव होता. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेने १३६ दिवसांत ४०८० किलोमीटरचा प्रवास केला, असे केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी सांगितले.
ही यात्रा तामिळनाडूपासून सुरू झाली आणि केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर अशा विवीध राज्यांतील सुमारे ७५ जिल्ह्यांतून जातांना यात्रेकरूंनी बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नांवर जनजागृती केली असे भारत जोडो यात्रेच्या समारोपाला श्रीनगरमध्ये उपस्थित असलेल्य दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसिस सार्दिन यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवार, ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगर येथे महात्मा गांधींना त्यांच्या हुतात्मा दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करतील. गोव्यासह देशभरातील काँग्रेसचे सर्व गट उद्या तिरंगा फडकवतील व महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील, अशी माहिती काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी दिली.
भारत जोडो यात्रेच्या समारोपानंतर पुढे कॉंग्रेस पक्षाने “हाथ से हाथ जोडो अभियान” आणि “म्हादई जागोर” सुरु केले आहे. येत्या १०० दिवसात गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात आमचे कार्यकर्ते हा कार्यक्रम राबवतिल, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.