राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा
जम्मू:
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी ही यात्रा श्रीनगरमध्ये संपेल. याआधी आज (रविवारी) दुपारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे आतापर्यंतचे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतरचे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सकाळी काही किलोमीटर चालल्यानंतर दुपारी १२ वाजता लाल चौकात पोहोचले. यावेळी राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर कांग्रेस नेते देखील उपस्थित होते.
#WATCH | Jammu and Kashmir: Congress MP Rahul Gandhi unfurls the national flag at Lal Chowk in Srinagar. pic.twitter.com/I4BmoMExfP
— ANI (@ANI) January 29, 2023
लाल चौकात तिरंगा फडकवण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं. त्यानंतर राहुल गांधी पुढच्या प्रवासाला निघाले. राहुल गांधी पुढे गेल्यानंतरही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लाल चौकात सेलिब्रेशन केलं.
यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू देखील उपस्थित होते. सुक्खू म्हणाले की, समाजात जेव्हा तिरस्कार वाढत होता तेव्हा राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंतची ही यात्रा सुरू केली. तिरस्कार सोडून भारत जोडा असं या यात्रेचं ब्रीद आहे. कोणीही या देशाच्या स्वातंत्र्याला धक्का लावला तर काँग्रेस ते सहन करणार नाही.