
राज्यभरात रामनवमी उत्साहात साजरी
पणजीसह राज्यभरात श्री रामनवमी सोहळा आज रविवारी उत्साहात पार पडला. रामनवमी निमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होती. गोव्यात रामराज्य असून सुराज्य असू दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाटले येथील राममंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर केली.
पणजीतील भाटले येथील श्री राम मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारी १२ वाजता श्री रामप्रभुंना पाळण्यात घालण्यात आले. यावेळी महिला भाविकांनी पाळणागीते गायिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
उस्ते सत्तरी येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. तसेच श्रीराम वारकरी मंडळाची दिंडी यावेळी सादर करण्यात आली. या मंदिरास ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. रामजन्माचा दुपारी पाळणा गीत, त्यानंतर आरती, भजन व महाप्रसाद झाला.
ठाणे सत्तरी येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवा निमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. सदर मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. सदर उत्सव पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच सत्तरीचा इतर भागात सुध्दा रामनवमी उत्साहात झाली.
खडकी येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा. चारशे वर्षांची महती सांगणारा खडकी येथील रामनवमी उत्सव आहे. यावेळी सकाळपासून मंदिरात भाविकांची गर्दी होती. त्यात दुपारी श्रीरामाला पाळण्यात घालण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन देवाच्या कृपा प्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी वाजता भजन, रात्री नाट्य प्रयोग सादर झाला. तसेच ७ रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरती व तीर्थप्रसाद होईल.
बोरी येथील श्री नवदुर्गा देवीचा चैत्र शुद्ध रामनवमी जत्रोत्सव आज रविवारी भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. या जत्रोत्सवात नवस बोलण्यासाठी तसेच फेडण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी असते.