
सभापती हे भाजप – पीडब्ल्यूडीचे प्रवक्ते आहेत का? : अमित पाटकर
पणजी :
भाजपचे किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रवक्ते म्हणून रमेश तवडकर यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मेणबत्तीच्या प्रकाशात झालेल्या पत्रकार परिषदेवर चटकन प्रतिक्रिया दिल्याचे दिसते. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी माझ्या दोन स्मरणपत्रांवर मात्र त्यांनी तशीच तत्परता दाखवली नाही, असा सणसणीत टोला काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी हाणला आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मेणबत्त्या पेटवून पत्रकार परिषद घेऊन नाटक केल्याचा गोवा विधानसभेच्या सभापतीनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमित पाटकर यांनी सभापती रमेश तवडकर यांना विधानसभा संकुलातील तथाकथित नूतनीकरणाच्या कामाच्या सर्व फाइल नोटींग सार्वजनिक करण्याचे उघड आव्हान दिले आहे.
विरोधी पक्षनेत्याच्या दालनातील काम निविदा न काढताच सुरू असल्याचा माझा दावा आहे व त्यावर मी ठाम आहे. भाजप सरकारने हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांच्या आणि कामांच्या मागे “मिशन टोटल कमिशन” असल्याने परिणामी सर्व प्रकल्प आणि कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत, असे अमित पाटकर म्हणाले.
भ्रष्ट भाजप सरकारने मार्च 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत मिनिस्टर ब्लॉकमधील मंत्र्यांच्या दालनांच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर 14.26 कोटी खर्च केले. नुकतेच गोवा विधानसभा संकुलाचे रंगकामाचे काम हाती घेण्यात आले. दुर्दैवाने, भिंतीवरचा केशरी रंग आता फिकट पिवळा पडला आहे. सभापती रमेश तवडकर रंगकाम केलेल्या कंत्राटदाराकडून स्पष्टीकरण मागतील का? असा सवाल अमित पाटकर यांनी विचारला आहे.
गोवा विधानसभेच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामात भाजप सरकारच्या “उलटा कारभाराचे” प्रतिबिंब दिसते. त्यांनी आधी इमारतीला रंगरंगोटी केली आणि आता छताचे वॉटर प्रूफिंगचे काम करत आहेत परिणामी वरून सर्व चिखल आणि घाण रंगकाम केलेल्या भिंतींवर वाहते, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
ग्रंथालय समितीचे अध्यक्ष कृष्णा उर्फ दाजी साळकर यांच्या दालनात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. विधानसभा संकुलात अंतर्गत भागात हल्लीच रंगकाम केलेला रंगही पुसट होत चालला आहे. स्वच्छतागृहांना गळती लागली असून सर्वत्र दुर्गंधी येत आहे. सभापती रमेश तवडकर यांनी पत्रकारांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाचा संपूर्ण विधानसभा संकुलाचा दौरा घडवून आणावा. सार्वजनीक बांधकाम खात्याने सुरू केलेली सर्व जर्जर कामे आम्ही उघडकीस आणू, असे आव्हान अमित पाटकर यांनी दिले आहे.
सभापती रमेश तवडकर यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य बजावावे. गोवा विधानसभेचे संकुल अद्याप दिव्यांग व्यक्तींसाठी “प्रवेशयोग्य आणि अनुकूल” का बनवले जात नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. विरोधी पक्षनेत्यावर बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी त्यांनी आधी आपली जबाबदारी पार पाडावी, असे अमित पाटकर म्हणाले.