पाय तियात्रिस्त जुआंव आगोस्तिन फर्नांडिस यांच्या जयंतीकडे रवींद्र भवन मडगावचे दुर्लक्ष?
मडगांव : आज पाय तियात्रिस्त जुआंव आगोस्तिनो फर्नांडिस यांची जयंती आहे. कोंकणी तियात्रची मुहूर्तमेढ रोवणारे आणि गोव्याच्या सांस्कृतिक व तियात्र कलाप्रकाराला दिशा देणारे ते एक अग्रणी व्यक्तिमत्त्व होते. मात्र, या महत्त्वाच्या दिवसाकडे रवींद्र भवन, मडगांव यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसत असून, गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील या महान व्यक्तिमत्त्वाच्या वारशाची कोणतीही दखल न घेतल्याने संस्थात्मक असंवेदनशीलता स्पष्ट होते, असे गोवा राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
या दिवसाचे महत्त्व असूनही रवींद्र भवन, मडगांव पूर्ण शांत आहे. पाय तियात्रिस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंकणी तियात्रच्या जनकाच्या जयंतीनिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही, कोणतीही आदरांजली जाहीर करण्यात आलेली नाही किंवा औपचारिक दखलही घेण्यात आलेली नाही, असे पै काकोडे यांनी नमूद केले.
हे दुर्लक्ष केवळ चुकून झालेले मानता येणार नाही. कोंकणी तियात्र तसेच गोव्याच्या रंगभूमीची पायाभरणी करणाऱ्या अग्रणी कलाकारांबाबत रवींद्र भवनकडून वारंवार दिसून येणाऱ्या उदासीनतेचे हे द्योतक आहे. रवींद्र भवन मडगांवचे लक्ष आता गोव्यातील कलाकारांपेक्षा बिगर गोमंतकीय कलाकारांच्या प्रचाराकडे अधिक झुकत असल्याचा आरोपही पै काकोडे यांनी केला.
रवींद्र भवन मडगांवचे मुख्य सभागृह पाय तियात्रिस्त जुआंव आगोस्तिन फर्नांडिस यांच्या नावाने समर्पित असताना त्यांच्या जयंतीकडे केलेले दुर्लक्ष अधिकच धक्कादायक आहे. यामुळे सध्याच्या कार्यकारी समितीची सांस्कृतिक असंवेदनशीलता उघड होते, असे ते म्हणाले.
सार्वजनिक निधीतून चालणाऱ्या आणि गोव्याच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी असलेल्या रवींद्र भवनने आपल्या प्राधान्यक्रमांचा गांभीर्याने पुनर्विचार करावा. गोव्याच्या सांस्कृतिक वारशातील महान व्यक्तींना सातत्यपूर्ण सन्मान मिळायला हवा, मौन आणि निवडक स्मरण नव्हे, असा निष्कर्ष पै काकोडे यांनी काढला.



