“रॉयल्टी” ने “लॉयल्टी” मागे टाकली : मिशेल रिबेलो
मडगाव :
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उद्योजीका पल्लवी धेंपे यांची दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार म्हणून घोषणा करुन “रॉयल्टी’ने लॉयल्टी” ला मागे टाकल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे,’ असा टोला काँग्रेस नेत्या आणि जिल्हा पंचायत सदस्य मिशेल रिबेलो यांनी हाणला आहे.
जर भाजपला खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर त्यांनी तळागाळातील कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती. हे ‘वुमन एम्पावरमेंट’ नसून, हे मोदी आणि शहा यांचे ‘वेल्थ एम्पावरमेंट’ आहे, असे मिशेल रिबेलो यांनी म्हटले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांना बाजूला ठेवून आपली मेहुणी पल्लवी धेंपे यांची उमेदवारी निश्चित केली असे मला काही कट्टर भाजप महिला कार्यकर्त्यांनी सांगितले, असा दावा मिशेल रिबेलो यांनी केला.
दक्षिण गोव्यासाठी एका उद्योजकीचे उमेदवार म्हणून नामांकन करणे ही आपल्या गोव्यातील जमीन भांडवलदारांच्या ताब्यात देण्याच्या मोठ्या कटाचा भाग आहे. गोव्यातील प्रत्येक इंच जमीन श्रीमंत आणि धन्याड्य लोकांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे, असे मिशेल रिबेलो यांनी सांगितले.
2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून दक्षिण गोव्याला एकामागून एक धक्के बसत आहेत. तीन रेखीय प्रकल्प, रेल्वे डबल ट्रॅकिंग, जैवविविधतेने समृद्ध लोलयें पठारावर फिल्मसिटी, सांगेत हरित जमिनीवर आयआयटी, दाबोळी विमातळावर एअरलाइन ऑपरेशन्समध्ये घट हे सर्व भाजपच्या कुटील कारस्थानाचा भाग आहे. भाजपला दक्षिण गोवा संपवायचा आहे, असा इशारा मिशेल रिबेलो यांनी दिला.
मी दक्षिण गोव्यातील सर्व महिलांना नम्रपणे आवाहन करते की, भाजपच्या “महिला सशक्तीकरणा” च्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका. भाजपने प्रथम महिला आमदारांना आपल्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामील करून घ्यावे व मगच महिला सशक्तीकरणावर बोलावे असे आव्हान मिशेल रिबेलो यांनी दिले आहे.
…