
शनिवार, १ नोव्हेंबर रोजी मडगावात “रिमेंबरिंग पात्रांव”
मडगाव: मडगांवचो आवाजतर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी सिताराम नाईक, ज्यांना “कॉमन मॅनचे चॅम्पियन” म्हणून प्रेमाने ओळखले जात होते, यांच्या स्मृतिप्रित्यर्थ “रिमेंबरिंग पात्रांव” हा आदरांजली कार्यक्रम शनिवार, १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता इम्पीरियल हॉल, डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियम, मडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
मडगावचो आवाजतर्फे आयोजकांनी माजी मुख्यमंत्री रवी सिताराम नाईक यांच्या परिवाराशी संवाद साधून त्यांच्या संमतीने हा स्मृतिपर कार्यक्रम आयोजित केला आहे. नाईक कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असून, गोव्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी व विद्यमान जनप्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व्यक्ती देखील उपस्थित राहून दिवंगत रवी नाईक यांना  श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
या स्मृतिसभेचे उद्दिष्ट रवी नाईक यांच्या जनतेसाठीच्या निस्वार्थ सेवाभावाचे, विचारांचे आणि नेतृत्वगुणांचे स्मरण व गौरव करणे आहे. ‘पात्रांव’ म्हणून प्रसिद्ध असलेले रवी नाईक आपल्या साधेपणा, ठामपणा, लोकसंपर्क आणि सर्वसामान्यांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे सर्वांच्या मनात घर करून गेले. त्यांचे नेतृत्व नम्रता आणि लोकसेवेच्या निष्ठेने परिभाषित झाले होते.
या स्मृती कार्यक्रमाविषयी बोलताना युवा नेते प्रभव नायक म्हणाले, “बाब रवी सिताराम नाईक हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर गोव्याच्या आत्म्याशी एकरूप झालेले जननेते होते. त्यांची करुणा, साधेपणा आणि लोकसेवा आजही आम्हा सर्वांना प्रामाणिकपणे समाजहितासाठी काम करण्याची प्रेरणा देते.”
मडगांवचो आवाजतर्फे सर्व नागरिकांना ‘रिमेंबरिंग पात्रांव’ या कार्यक्रमास उपस्थित राहून जननेत्यास आदरांजली अर्पण करण्याचे आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
 
				 
 
 
 
 
 

