सीमा हैदरची ‘हि’ शिफारस राष्ट्रपतींपर्यंत पोहोचली…
Seema Haider: देशभरात मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदरची लव्हस्टोरी चर्चेचा केंद्रबिंदू आहे. यातच, सीमाला तिच्या मायदेशात (पाकिस्तान) परत पाठवायचे की नाही याबाबत निर्णय होणे बाकी आहे, परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये दररोज नवीन ट्विस्ट येत आहेत. हे प्रकरण आज राष्ट्रपतींपर्यंत पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाने दाखल केलेल्या दयेच्या याचिकेत सीमाला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी करण्यात आली आहे, कारण ती पाकिस्तानातील सर्व काही सोडून केवळ प्रेमाखातर भारतात आली आहे.
माध्यमाशी बोलताना एपी सिंह म्हणाले की, ‘सीमावर अनेक आरोप केले जात आहेत. कोणी तिला दहशतवादी म्हणत आहेत, तर कोणी तिला ISI एजंट म्हणत आहेत तर कोणी तिला ‘घुसखोर’ म्हणत आहेत.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर आणि नेपाळमध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार सचिनशी लग्न केल्यानंतर ती तिच्या चार निष्पाप मुलांसह भारतात आली. त्याकडे मानवतेच्या आणि प्रेमाच्या दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे.’
दरम्यान, सीमा हैदर पाकिस्तानची रहिवासी आहे. मात्र आता, ती तिचा प्रियकर सचिन मीनासोबत भारतात राहत आहे. दोघेही उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे राहत आहेत. आपल्या प्रेमाखातर ती हिंदू झाली असून शाकाहारी बनल्याचे सीमा सांगते. सीमा सांगते की, ती पाकिस्तानात गेली तर तिला मारले जाईल.
दुसरीकडे, सीमा हैदरच्या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयही लक्ष ठेवून आहे. सीमाशी संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. सीमाने 13 मे रोजी नेपाळमार्गे तिच्या चार मुलांसह भारतात अवैधरित्या प्रवेश केला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला या प्रकरणाची माहिती आहे. तिने न्यायालयात हजर राहून जामीन मिळवला आहे. ती जामिनावर बाहेर असून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
तसेच, बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तिचा प्रियकर सचिनला अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दोघांना स्थानिक न्यायालयाने 7 जुलै रोजी जामीन मंजूर केला होता. सीमा ग्रेटर नोएडातील रब्बुपुरामध्ये सचिनसोबत तिच्या 4 मुलांसह राहत आहे.