महाराष्ट्र

मुंबईत शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाचा भाजपाला प्रस्ताव?

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या महापालिकांच्या निवडणुकीत मुंबईत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं, तर ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. यानंतर आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपाकडे अडीच-अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चांवर आता भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिंदेंच्या सेनेकडून असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही’, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

मुंबई महापालिकेत अडीच-अडीच वर्ष महापौर व्हावा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेने केली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आमच्या पार्लमेंट्री बोर्डाकडे अशी कोणतीही मागणी आलेली नाही. आमच्या पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होईल, आमच्या महायुतीच्या समन्वयक समितीमध्ये एकनाथ शिंदे देखील आहेत, अजित पवार देखील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा होईल. कोणी काय मागणी केली? यावर देखील चर्चा होईल. तसेच एकनाथ शिंदे यांना काही चर्चा करायची असेल तर ते थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ३० वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपाला यश आलं. त्यानंतर ‘देवाच्या मनात आलं तर शिवसेनेचा महापौर बनेल’ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. तसेच आज संजय राऊतांनी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू असल्याचं सूचक वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आधी तुम्ही तुमचे निवडून आलेले नगरसेवक सांभाळा. कारण एवढे सगळे तुमचे आमदार फुटले. जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार? तुम्ही आमची चिंता नका करू. आमची पार्टी मजबूत आहे”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली.

“आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. लोकांनी कौल दिला आहे तो महायुती म्हणून दिला. महायुती म्हणूनच सत्तेत येणार”, अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी बोलून दाखवली.

तसेच नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भातही त्यांनी माहिती दिली. “आमचे जवळपास २० नगरसेवक हे नवखे आहेत, त्यांना मनपाचं कामकाज माहीत नाही. त्यामुळे, त्याच संदर्भाने आम्ही नगरसेवकांसाठी दोन दिवसीय शिबीर घेतलं आहे, त्यासाठी हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. शिवाय हे सगळेजण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवकांना हरवून आलेत”, असंही शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!