आ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
सातारा (महेश पवार) :
देवदर्शनासह एहसास मतीमंदांच्या शाळेला अर्थसहाय्य, रक्तदान शिबिर, रिमांड होममध्ये मुलांना भोजन आदी विविध सामाजिक उपक्रमांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस गुरुवारी साधेपणाने साजरा करण्यात आला. भाजपचे नेते गिरीष बापट यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.
सकाळी ९ वाजता चिमणपुरा पेठेतील गारेचा गणपती येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे तथा बाबाराजेनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर बाबाराजेंनी अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावरील श्री भवानी मातेचं दर्शन घेतले. कारखान्यावर स्व. अभयसिंहराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. याच ठिकाणी आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिरास बाबाराजेंनी भेट दिली.
या कार्यक्रमानंतर बाबाराजेंनी कार्यकर्त्यांसह वळसे, ता. सातारा येथील एहसास गतीमंदांच्या शाळेत विद्यार्थ्यांची भेट व शाळेला अर्थसहाय्य केले. त्यानंतर संगम माहुली येथे महाराणी येसुबाई यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. समाधीस्थळ तसेच संगम माहुली व क्षेत्र माहुली या दोन्ही ठिकाणी सोई-सुविधांच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे याप्रसंगी बाबाराजेंनी सांगितले. यानंतर गोडोली येथे गोडोलीकर नागरिक आणि कार्यकर्ते रवी पवार यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भेट दिली. सदरबझार येथील रिमांड होम येथे बाबाराजेंच्या उपस्थितीत वाढदिनानिमित्त मुलांना भोजन देण्यात आले.
सायंकाळी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणावर बाबाराजेंनी कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकार करत अत्यंत साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला.