google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न’


मुंबई :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला.


“जिल्हा परिषद अंगणवाडी सेविका यांना सभेला उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. अशाप्रकारे सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होत असून
या सभेसाठी बोलवण्यात आलेल्यांच रेटकार्ड प्रसिद्ध झाले आहे. यानुसार सभेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत,” असे दानवे म्हणाले.

शेतकऱ्यांना मदतीची घोषणा फसवी
शिंदे फडणवीस सरकारने अतिवृष्टी पीडितांना
३ हजार कोटींची मदत योजना जाहीर केली आहे. अतिवृष्टी पीडितांना मदतीचे निकष 1 हेक्टरने वाढवून सुद्धा प्रत्यक्षात मदतीची रक्कम कमी करण्यात आली आहे. अद्याप अनेक नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्यात आला नाही. सरकार एकप्रकारे आकड्यांचा खेळ करतेय. पिकांच्या प्रतवारी नुसार मदत करणं आवश्यक असताना सरकारने तुटपुंजी मदतीची फसवी घोषणा केल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले,पूल वाहून गेले,त्याला कोणती मदत नाही देण्यात आली नाही, त्यामुळे सर्वच नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी दानवे यांनी केली.

‘आदिवासींच्या समस्यांबाबत सरकार असंवेदनशील’

इगतपुरी येथे आदिवासींची मुलं ही वेठबिगारीसाठी विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशाप्रकारे विक्री केलेल्या एका अल्पवयीन मुलीला अत्यवस्थ अवस्थेत आणून टाकण्यात आले त्यात त्या मुलीचा मृत्यू झाला आहे.


“या गंभीर प्रकरणाची साधी दखल ना सरकारने घेतली आणि ना सरकारने गुन्हे दाखल केले! यावरून सरकार आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत असंवेदनशील असल्याचं स्पष्ट होते,” अशी टीका विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली. आदिवासी समजाच्या विकासासाठीच्या योजना फक्त कागदावरंच असून प्रत्यक्षात त्यांना कोणतीच मदत मिळत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.

‘जयंत पाटील यांच्या मताशी मी सहमत’

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत असून सरन्यायाधीश यांनी संकेत पाळायला हवे असे दानवे म्हणाले.

नवनीत राणा दंगल माजवू बघतात का?
लव्ह जिहादवरून राजकारण करत खासदार नवनीत राणा दंगली माजवण्याचा कट रचताय का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. बेपत्ता असलेल्या त्या मुलीने स्वतः रागाच्या भरात गेल्याचं पोलिसांना सांगितलं. यावरून समाजात तेढ वाढवण्याचं काम राणा करतायत हे स्पष्ट होतय. हे दुसऱ्यांना हिंदुत्व शिकवतात, यांना गणेश विसर्जन कसं करायचं याचीही माहिती नसल्याचे म्हणत राणा दांपत्य यांच्या गणेश विसर्जनाच्या व्हायरल व्हिडिओवर दानवे यांनी हल्लाबोल केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!