मुंबई आयआयटीच्या अहवालात युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केलेल्या तसेच पृथ्वी ग्रहावरील 35 जैव विविधता स्थळांपैकी एक असलेल्या 1600 किलोमीटर लांब पश्चिम घाटात मातीची धूप अती जलद गतीने होत असल्याचे नमूद केले आहे. सदर अहवालात जवळपास 80 टक्के मातीची धूप झाली असल्याचे म्हटले आहे. विध्वंसक तीन रेखीय प्रकल्पांवर पुनर्विचार करण्यासाठी भाजप सरकारसाठी ही आणखी एक “धोक्याची घंटा” आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्यावतीने प्रा. पेन्नन चिन्नासामी आणि प्रा. वैष्णवी होनप यांनी तयार केलेल्या अभ्यास अहवालात पश्चिम घाटात झपाट्याने वाढणारी मातीची धूप व त्यापासूनचा धोका यावर प्रतिक्रीया देताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारने सदर अहवावातील माहिती अभ्यासणे आवश्यक असल्याचे सांगून, गोवा सरकारने सदर अहवालाचा युद्धपातळीवर अभ्यास करून सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
आयआयटीच्या अहवालात पश्चिम घाट प्रदेशातील अतिवृष्टी व पूरामूळे कृषी उत्पादकतेवर मोठा आघात झाल्याचे तसेच पाण्याची गुणवत्ता कमी झाली असल्याचे व शुद्ध पाण्याचे स्त्रोत प्रभावित केले असल्याचे म्हटले आहे. सदर स्थितीमूळे पर्यावरणीय आणि सामाजिक-आर्थिक आव्हाने उभी राहिली असून पश्चिम घाटाच्या अद्वितीय जैव विविधतेवर परिणाम झाला असल्याचे ठळकपणे समोर आले आहे. या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशींची गांभीर्याने दखल घेणे व कृती योजना आखणे आता भाजप सरकारचे काम आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
भाजप सरकारची धोरणे पर्यावरण विरोधी आणि भांडवलदारांच्या हिताची आहेत. गोव्यातील स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच गोव्याची ओळख सुरक्षित आहे. भाजप सरकारच्या विध्वंसक धोरणांपासून गोव्याला वाचवण्यासाठी केलेल्या परिश्रम आणि प्रयत्नांसाठी गोमंतकीय एनजीओ आणि कार्यकर्त्यांचे नेहमीच ऋणी राहतील, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.