देशाला मिळाले सर्वात महागडे नाणे
नवी दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनादिनी टपाल तिकिट आणि ७५ रुपयांच्या नाण्याचे आज अनावरण केले. आजचा दिवस कायम लक्षात राहावा याकरता हे अनावरण करण्यात आले आहे.
नव्या संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमात लोकसभेत सर्व सदस्य स्थानापन्न झाले. यावेळी लोकसभेतील काही सदस्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संबोधित करत या नव्या संसद भवनाचे महत्त्व विषद केले. त्याआधी आजचा हा दिवस सर्वांच्या कायम संस्मरणात राहावा याकरता टपाल तिकिट आणि ७५ रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून जारी झालेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, या नाण्याचे वजन ३४.६५ ते ३५.३५ ग्रॅमचे आहे. या नाण्याच्या एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाचा सिंह आहे. तर, डावीकडे देवनागरी लिपित भारत लिहिलेले आहे. तर, उजवीकडे India असं इंग्रजीत लिहिलेले आहे. तसंच, अशोक स्तंभाच्या सिंहाखाली रुपयाचे चिन्ह असून 75 असं अंकात लिहिलेले आहे. या नाण्याचा व्यास ४४ मिमी असून हे नाणे चार धातुंनी तयार केलेले आहे. यामध्ये ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र असेल तर वरच्या बाजूला देवनागरीत संसक संकुल तर खालच्या बाजूला इंग्रजीत संसद संकुल असे लिहिलेले आहे. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले दिसेल.
दरम्यान, सरकार विविध विशेष प्रसंगी नवीन नाणी किंवा टपाल तिकिट जारी करते. यावेळी ७५ रुपयांचे नाणे चलनात आणून हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आणि महाग नाणे आहे.