प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तामिळ अभिनेता मन्सूर अली खानचा मुलगा अली खान तुगलक याला अटक झाली आहे. बंदी घातलेले ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि विक्री केल्याप्रकरणी त्याला इतर नऊ जणांसह अटक करण्यात आली आहे. ‘ओजी’ नावाने हे गांजा आणि इतर अंमली पदार्थांची विक्री करत होते. पोलिसांच्या एका विशेष पथकाने केलेल्या तपासानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, झिदान झुबीन या टोळीचा मुख्य सूत्रधार होता. त्याच्या चौकशीत अधिकाऱ्यांना अधिक माहिती मिळाली आणि पुढे तपास करण्यात आला. त्याच्या माहितीच्या आधारे, टीमने अली खान तुगलक आणि इतर आरोपींचा शोध घेतला. अखेर त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली.
एकूण १० जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी अली खान तुगलक याच्यासह सात जणांना अंबत्तूर न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. झिदान झुबीनच्या फोनमधून धक्कादायक बाबी आढळल्या आहेत. त्याच्या फोनमधून कथित ड्रग पेमेंटसाठी पेमेंट करण्यात आले होते. तसेच त्याच्या फोनमुळेच या गँगमधील इतर सदस्यांची नावं उघड झाली.
ही गँग आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मन्नाडी येथील मोहम्मद व जयमुजीन यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोघे कट्टनकुलथूर येथील एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रग्जसाठी टार्गेट करत होते. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर हे सगळं प्रकरण उलगडत गेलं. सध्या अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. या ड्रग्ज प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, त्याचा शोध ते घेत आहेत.