‘काकणांमोड्डी बेकायदेशीर डोंगरकापणीला दिलेली तांत्रिक मंजुरी रद्द’
मडगाव :
कुंकळ्ळीकरांच्या भावनांचा आदर करण्याची बांधिलकी ही माझी नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता असेल. काकणांमोड्डी येथील बेकायदेशीर डोंगर कापणीला दिलेली तांत्रिक मंजुरी रद्द केल्याबद्दल मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांचे आभार मानतो. नैसर्गिक जलस्त्रोतांचे पुढील पिढीसाठी संरक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते आणि कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
नगर नियोजन खात्याने काकणांमोड्डी डोंगरकापणीला दिलेली मंजुरी मागे घेण्याचा आदेश जारी केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, युरी आलेमाव यांनी सदर आदेशाचे श्रेय हे बेकायदेशीर डोंगर कापणीविरुद्ध तक्रारी दाखल करून आणि सदर जागेवर आंदोलन करणाऱ्या कुंकळ्ळीच्या रहिवाशाना दिले आहे.
गेल्या विधानसभा अधिवेशनात तसेच गुरुवारी संपलेल्या तिसर्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला होता. काकणांमोड्डी येथे चालू असलेले काम पूर्णपणे बेकायदेशीर आहे या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी विविध कागदपत्रेही सरकारला सादर केली होती, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.
चुकीचा कंटोर प्लॅन सादर करून बेकायदा डोंगर कापणी करण्यात आली. बेकायदेशीर डोंगरकापणी करताना कंत्राटदाराने नगर नियोजन कायद्याच्या कलम १७ अ चे उल्लंघन केले. जवळपास ३० मीटर लांबीच्या व १० मीटर रुंदीच्या अंतर्गत उपविभाग रस्त्याच्या विकासासाठी उतार असलेली जमीन कापण्यात आली होती. या उघड उल्लंघनामुळे डोंगराचा नाश झाला, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
कुंकळ्ळीकरांच्या समस्या सोडविण्यास मी सर्वोच्च प्राधान्य देईन. मला आशा आहे की विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार सरकार कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीर कारखान्यांविरुद्ध लवकरच कारवाई करेल तसेच सार्वजनीक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्य महामार्ग ८ ची अधिसूचना रद्द करेल, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.