गोवा

‘सरकारी पातळीवर व्हावा हिरकमहोत्सवी ‘जनमत कौल’ साजरा’

मडगाव : गोव्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या १६ जानेवारी १९६७ च्या ऐतिहासिक जनमत कौलाच्या ६० वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर, मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा सरकारकडे २०२६ हे वर्ष हिरक महोत्सव प्रारंभ वर्ष म्हणून जाहीर करण्याची जोरदार मागणी केली आहे. या जनमत कौलामूळेच गोव्याची वेगळी सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक ओळख व अस्मिता निर्णायकपणे सुरक्षित राहिली असे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केलेल्या सविस्तर निवेदनात युवा नेता प्रभव नायक यांनी नमूद केले की, जनमत चाचणी ही गोव्याच्या इतिहासाची दिशा बदलणारी एक अद्वितीय लोकशाही प्रक्रिया होती. याच प्रक्रियेच्या परिणामी कोंकणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला आणि गोव्याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला. ५९ वर्षांची पूर्तता आणि ६० व्या वर्षाकडे नेणाऱ्या हिरक महोत्सव वर्षाची सुरुवात केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरती मर्यादित राहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निवेदनात १६ जानेवारी २०२६ रोजी भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाने वर्षभर चालणाऱ्या राज्य पुरस्कृत जनमत कौल हिरक महोत्सवाची सुरुवात करून १६ जानेवारी २०२७ रोजी अस्मिताय दिनी समारोप कार्यक्रमाने त्याची सांगता करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील मंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांची अनिवार्य उपस्थिती असावी, असेही निवेदनात प्रभव नायक यांनी नमूद केले आहे.

'The diamond jubilee 'public opinion poll' should be celebrated at the government level.'

जनमत कौल चळवळीतील अग्रणी अ‍ॅड. उदय भेंब्रे व एन. शिवदास व इतरांचा औपचारिक सत्कार करावा, तसेच डॉ. जॅक सिक्वेरा, पुरूषोत्तम काकोडकर, शाबू देसाई, उल्हास बुयांव, व्हिक्टोरिया (मामी) फर्नांडिस, रवी सीताराम नाईक आणि इतर अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

यंदाचा अस्मिताय दिन साजरा करण्यासाठी शिक्षण खात्याने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकाबाबत गंभीर चिंता मडगांवचो आवाजने निवेदनात व्यक्त केली आहे. सदर परिपत्रकात, शाळांना अस्मिताय दिन कार्यक्रमाचे आयोजन ऐच्छिक करण्यात आले आहे व त्याचा आर्थिक भार शाळांवर टाकण्यात आला आहे हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे. मडगांवचो आवाजने स्पष्ट केले की अस्मिताय दिनाचे स्मरण ऐच्छिक असू शकत नाही; ओपिनीयन पोलचा हिरक महोत्सव साजरा करणे राज्य सरकारचे कर्तव्य असून संपूर्ण आर्थिक जबाबदारी सरकारने घ्यावी आणि सर्व शाळांमध्ये त्याचे सक्तीने पालन व्हावे, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.

गोव्याची ओळख व अस्मिता कुणी दान दिलेली नसून ती लोकशाही मार्गाने लढून व जपून मिळवलेली आहे, हे अधोरेखित करत प्रभव नायक यांनी सरकारला तातडीने व गांभीर्याने पावले उचलण्याचे आवाहन केले. मडगांवचो आवाजने ठामपणे सांगितले की जनमत कौलाचा हिरक महोत्सव हा गोव्याच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व असलेला असल्याने तो सन्मान, सर्वसमावेशकता आणि व्यापकतेने साजरा केला गेला पाहिजे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!