‘जलमंदिरा’त चक्क मुख्यमंत्री यांच्या बॉडीगार्डलाच ‘नो एन्ट्री’
सातारा :
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सातारा शहरात बॅनरबाजी व जाहिरात बाजीने डोळे दीपावून टाकलेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही सातारा येथील खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिरात आले. त्यांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच जलमंदिराची पाहणी करण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही. परंतु, त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्यात बॉडीगार्डला नो एन्ट्री केली. त्यामुळे साताऱ्यात प्रोटोकॉलचा अतिरेक होत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
सातारा शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना अडीअडचणी सोडवण्यासाठी व न्याय मागणीसाठी सातारा शहरातील एक तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यावर व खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी भेट द्यावी लागते. या ठिकाणी सामान्य माणसाला सुद्धा भेट घडवून आणली जाते. त्यांचे प्रश्न मार्गी लागतात. मात्र, आज खा. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोटोकॉलचा अतिरेक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
ज्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व जनतेच्या हितासाठी लगाम घालावा अशा काही व्यक्तींना काही पोलीस सलाम करत होते. तर सामान्यांना अडवले जात होते. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील बॉडीगार्ड (अंगरक्षक) हे सुद्धा या नो एन्ट्री पासून वाचू शकले नाहीत. एका पोलीस अधिकाऱ्यांनी चक्क बॉडीगार्ड यांनाच मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीमागे जलमंदिर परिसरात जाण्यास मज्जाव केला. त्यांना रोखून धरले. खरं म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रोटोकॉल च्या नियमाप्रमाणे त्यांना कोणती इजा होऊ नये. याची संपूर्ण जबाबदारी ही बॉडीगार्ड वर असते.
एका कार्यक्रमांमध्ये एक शासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या जवळ जात असताना बॉडीगार्डने त्याला समजून सांगून पाठीमागे उभे रहा असा सल्ला दिला पण त्याने तो ऐकला नाही.त्यानंतर चक्क त्याला उचलून बाजूला केले. एवढी ताकद व धमक बॉडीगार्ड कडे असताना त्या पोलिस अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून प्रोटोकॉल पाळला ? याची आता चौकशी करावी. अशी मागणी होऊ लागलेली आहे.
खा. उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी थेट भारत देशाच्या सीमारेषेवरून अनेक जण मोबाईल द्वारे संपर्क साधून शुभेच्छा देत आहेत. अशा वेळेला मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डला अडवून ठेवले. हे योग्य नाही. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. एवढा साधा नियम सुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्याला समजू नये. याचे मात्र अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वाढदिवसा दिनी खेड्यापाड्यातून लोक आले होते. या शुभेच्छा म्हणजे एक प्रकारे त्यांना मतदान करण्याची हमी आहे .
आज सातारा जिल्ह्यात व शहरांमध्ये अनेक ठिकाणी बॅनरबाजी झालेली आहे. ज्यांनी बॅनर लावलेले आहेत त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले का त्यातून काय फायदा घेण्यासाठी लावले आहेत? हे मात्र समजू शकले नाही. खा. उदयनराजे भोसले यांच्या समवेत असणारे सुनील तात्या काटकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, पाटील व पिंटू जाधव, बाळासाहेब ननावरे, सनी भोसले , युनूस असे अनेक मान्यवर हे सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी खारीचा वाटा उचलतात. अशा लोकांच्या छबीमुळे नागरिकांमध्ये एक चांगला संदेश जातो. परंतु, काहींची छबी पाहून काय बोलावे.. काय नाही… अगदी उदयनराजेंच्या शब्दातून सांगायचं म्हणजे काय बाई सांगू… कस ग सांगू.. मनात माझ्या.. अशी अवस्था काही समर्थकांची निश्चितच झाली असेल? याची ही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्याचा बोध घ्यावा हीच माफक अपेक्षा आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते.