google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

ऊसाचे बिल न मिळाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सातारा (महेश पवार) :

लोहारे, ता. वाई येथील नारायण गणपत सपकाळ या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला वैतागल्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेनंतर पुन्हा एकदा सामान्य, गरीब शेतकरी भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा बळी ठरत असल्याचे समोर आले आहे.

ऊस उत्पादन असल्याने सधन पट्टा समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत नाही हा समज आता खोटा ठरत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करु लागलाय याचा अर्थ हरित पट्ट्यातील शेतकरी सुद्धा आता सुखी राहिला नाही असा होतो.

कृषी मालाला किमान भाव मिळाल्याशिवाय शेतकर्‍याला न्याय मिळू शकणार नाही. सोसायट्या, बँका, पतसंस्था, साखर कारखानदार आदी सर्वजण शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित कधीही जुळवून देणार नाहीत. यापैकी सर्वात मोठा लुटारू कोण असेल तर साखर कारखानदार. कारखान्याकडून शेतकरी कर्ज घेत नाही. अपवाद वगळता उचल सुद्धा घेतली जात नाही. उलट कष्टाने पिकवलेला ऊस कारखान्याला घातला जातो. नाही म्हटल तरी काटामारी, कमी दर, वेळेवर हप्ते न मिळणे या बाबींमुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होते. शेतकरी सर्व बाजुने नाडला जातोय.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. ते शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान जवळून पाहिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ कुणी आणली याचा शोध आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेवून शेतकऱ्यांना भ्रष्ट व्यवस्थेच्या विळख्यातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. जावली, वाई तालुक्यातील बहुतांश विकास सेवा सोसायट्यांमध्ये संगनमताने सचिवांनी बोगस कर्ज प्रकरणे करून गावोगावींच्या शेतकऱ्यांना कर्जबाजारी केल्याचे उघड झाले आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्याला न देता सचिवाने परस्पर लाटल्याची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत.

सिंचनाची सुविधा नसताना अनेक शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर स्ट्राबेरी, ऊस पीक कर्ज उचलली गेली आहेत. वाई तालुक्यात किसन वीर सहकारी साखर कारखान्याने कित्येक शेतकऱ्यांच्या नावावर आधीच शेअर्स असताना पुन्हा नव्याने शेअर्सच्या नावाने सोसायटीत कर्ज केली आहेत. लोहारे येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नावावर सुद्धा अशा प्रकारचे कर्ज चढवले असल्याचे समोर येत आहे. जावली, वाई तालुक्यातील सोसायट्यांमधील घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना वाचवावे, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!