दिल्लीत तिकिटासाठी वाट पाहणाऱ्या उदयनराजेंना धक्का?
सातारा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमित शाहांना गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्लीदरबारी जाऊन बसले आहेत. सलग तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असतानाही अमित शाह यांनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही. अशातच आता भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्याच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. भाजपाने मला याठिकाणी संधी द्यावी, अशी मागणीच त्यांनी केली आहे.
सातारा लोकसभेबाबत नरेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात छत्रपती उदयनराजेंसमोर लढायला कुणीच उमेदवार तयार नव्हता. पण भाजपाने मला शिवसेनेत जाऊन निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मी शिवसेनेतून निवडणूक लढलो आणि मला साडे चार लाखांच्यावर मते मिळाली. छत्रपती उदयनराजेंनाही तेवढ्याच प्रमाणात मते मिळाली होती. आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त ३० ते ३५ हजारांचा फरक होता.”
नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, “आजही माझा दावा आहे की, भाजपाने कमळ या चिन्हावर सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला द्यावी. माझं ग्रामीण भागात चांगलं काम आहे. कार्यकर्त्यांसाठी मी संबंध महाराष्ट्रात फिरत असतो. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे, त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी. त्यामुळे माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंग्रशेखर बावनकुळे मला संधी देतील, अशी आशा आहे.”
खासदार उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. मात्र त्यांना भेट मिळत नाही, हे ऐकून मलाही खूप वाईट वाटलं. एकाबाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो, दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहेत. अशावेळी त्यांना जर भेट मिळत नसेल तर त्यांनी हा पेच समजून घ्यायला हवा. उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे होते. महायुतीमध्ये लढत असताना अजित पवार गट आणि भाजपाने सातारा लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करायला हवा”, असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.
…