
‘विशेष’ मुलांमध्ये ‘उमंग’चा उत्साह
सांखळी :
गोव्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विशेष मुलांच्या प्रतिभेला व्यासपीठ देणारा ‘उमंग – सेलिब्रेट एव्हरी एबिलिटी’ हा राज्यस्तरीय समावेशक कार्यक्रम नुकताच सांखळी येथील रवींद्र भवन येथे उत्साहात पार पडला. राजेश्री क्रिएशन्स आणि केशव सेवा साधना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सुमारे ३०० विशेष मुलांनी शिक्षक आणि पालकांसह सहभाग घेतला.
यावेळी आयोजित विविध स्पर्धाच्या एकूण निकालामध्ये चेतना एज्युकेशन सोसायटी, कुडचडे यांनी ‘उमंग चॅम्पियन’चा मान पटकावला. केशव सेवा साधना, दिवचल यांनी प्रथम उपविजेतेपद मिळवले, तर गुजराती समाज स्पेशल स्कूल, मडगाव यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळवले.
कथाकथन स्पर्धेत अमोल उमेश नाईक (केशव साधना स्कूल, वाळपई) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. अॅरॉन जोसेफ अल्बुकर्क (चेतना एज्युकेशन सोसायटी, कुडचडे ) यांनी द्वितीय, तर अपर्णा वालिकर (गुजराती समाज, मडगाव) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिके हेरंब तेलंग (लोकविश्वास प्रतिष्ठान, फोंडा) आणि श्लोक नाईक (लोकविश्वास प्रतिष्ठान, मोले) यांना देण्यात आली.
फायरलेस कुकिंग स्पर्धेत रुची सावंत आणि रिया गावडे (केशव सेवा साधना, दिवचल) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. चिराग वळवईकर आणि विनायक हळदणकर (संजय सेंटर स्पेशल स्कूल, पर्वरी) यांनी द्वितीय, तर शिवम नाईक आणि फ्रेशिया फर्नांडिस (चेतना एज्युकेशन सोसायटी, कुडचडे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके आकाश नाईक आणि रिचा गावडे (लोकविश्वास प्रतिष्ठान, फोंडा) तसेच लक्ष्मी सरोज आणि संगीता हंपिवळी (संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, वास्को) यांना मिळाली.
एकल गायन स्पर्धेत अफरीन बेपारी (गुजराती समाज, मडगाव) प्रथम आली. लिवोन कोस्टा (सेंट झेवियर अकॅडमी, जुने गोवा) यांनी द्वितीय, तर ओम गावस (चेतना एज्युकेशन सोसायटी, कुडचडे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके धनुष जाधव (केशव सेवा साधना, दिवचल) आणि सोनल नाईक (एसएफएएल, पीपल्स एनजीओ) यांना मिळाली.
ग्रीटिंग कार्ड मेकिंग स्पर्धेत शिवानी चारी (लोकविश्वास प्रतिष्ठान, मोले) प्रथम आली. विघ्नेश पेडणेकर (केशव सेवा साधना, दिवचल) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर ऑल्टन कोलाको आणि नातिक गावस (संजय सेंटर फॉर स्पेशल स्कूल, पर्वरी) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके लक्ष्मी पवणे (केशव सेवा साधना, वाळपई) तसेच रुपाब बी आणि संजना नाईक (लोकविश्वास प्रतिष्ठान, फोंडा) यांना मिळाली.
भारतीय लोकनृत्य स्पर्धेत चेतना एज्युकेशन सोसायटी, कुडचडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. गुजराती समाज स्पेशल स्कूल, मडगाव यांनी द्वितीय, तर केशव सेवा साधना, दिवचल यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ पारितोषिके केशव सेवा साधना, वाळपई आणि लोकविश्वास प्रतिष्ठान, फोंडा यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी दिवचलचे आमदार चंद्रकांत शेट्ये, दिव्यांग आयुक्तालयाचे राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर, सांखळी नगरपालिकेच्या अध्यक्षा सिद्धी प्रभू पोरोब, उपाध्यक्ष दयानंद बोर्येकर, केशव सेवा साधनाचे अध्यक्ष सागर शेट्ये आणि व्यवस्थापक मकरंद कामत उपस्थित होते. राजेश्री क्रिएशन्सचे संस्थापक परेश पी. नाईक, विशेष शिक्षिका मंजिरी जोग आणि प्रमोटर क्षितिजा गावंकर देखील उपस्थित होते.
समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यास सामाजिक कल्याण व दिव्यांग सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मयेचे आमदार प्रेमेन्द्र शेट, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, केशव सेवा साधनाचे अध्यक्ष अॅड. गोविंद हेगडे देसाई, सचिव लक्ष्मण (नाना) बेहरे आणि मुख्याध्यापिका संजना प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.
यावेळी स्पर्धांबरोबरच मुलांसाठी क्लाउन जुगलिंग, बबल शो आणि विविध खेळ यांसारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हा दिवस विशेष मुलांसाठी आनंद, आत्मविश्वास देणारा ठरल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आवर्जून सांगितले.

