अमित शाह मुंबई दौऱ्यावर; ‘काय’ होणार आजच्या बैठकीत?
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामान कारवा लागला. मात्र आता लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप नेते अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
अमित शाह आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची दुपारी दीड वाजता बैठक आहे. दादरमधील स्वामी नारायण मंदिरातील योगी सभागृहात ही बैठक होणार आहे. तर नवी मुंबईतील सिडको ऑडिटोरियममध्ये सायंकाळी साडेचार वाजता ठाणे आणि कोकण विभागातील आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत.
दरम्यान दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ठाणे शहराजवळील कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम ५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती राहणार आहे.