महाराष्ट्र
चंदगडमध्ये शिवाजीराव पाटील ‘तुतारी’ हातात घेणार?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. भाजप नेते, शिवाजीराव पाटील ‘तुतारी’ हातात घेणार, असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ( Ncp ) पाटील यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती समोर येत आहे.
कागलमधून समरजितसिंह घाटगे ( Samarjitsinh Ghatge ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केला आहे. यातच चंडगडमधून शिवाजीराव पाटील यांनी ‘तुतारी’ फुंकली, तर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो.
शिवाजीराव पाटील देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. शिवाजीराव पाटील यांनी ‘तुतारी’ हाती घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी भाजपचे नेतृत्त्व कोणते पाऊल उचलणार? हे पाहावं लागणार आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) भाजपला सहकार्य होत नसल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. शिवाय भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट) आमदार राजेश पाटील यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे भाजप नेतृत्त्वानं चंदगड विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा. चंदगडमध्ये भाजप वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठीने लक्ष घालावे, अशा पद्धतीची भावना भाजप कार्यकर्त्यांची आहे. एकंदरीतच महायुतीमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र यावरून दिसत आहे.