रवींद्रबाबांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी सरकारकडे निधी नाही ?
मडगाव :
राज्यात विविध इव्हेंट आयोजनावर करोडो रुपये खर्च केले जातात. दुर्दैवाने, बौद्धिकदृष्ट्या दिवाळखोर भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्रबाब केळेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी आणि राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पैसे नाहीत. महान गोमंतकीयांचा आदर करायला शिका!, अशी बोचरी टिका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गोव्यातील नामवंत कोकणी कवी आणि लेखक मनोहरराय सरदेसाई आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रवींद्रबाब केळेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची मी सरकारला आठवण करून दिली होती. गोव्यातील अशा महान गोंयकारांकडे सरकारने दुर्लक्ष केले हे खेदजनक आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गोव्यासाठी योगदान दिलेल्या महान गोमंतकीयांचा सन्मान करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारला राष्ट्रीय वीरांच्या नावाने उत्सव आयोजीत करताना महान गोंयकारांकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचा निवडक दृष्टिकोन थांबवावा आणि संघप्रचारक म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून कर्तव्य बजावावे असा जबरदस्त टोला युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी रवींद्रबाबांची शताब्दी 2024 मध्ये सुरू होत आहे हे सत्य स्वीकारले आणि रवींद्र केळेकर यांच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज प्रियोळ येथे रस्त्याच्या नामकरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे आमंत्रण स्वीकारले याचा मला आनंद आहे असे युरी आलेमाव म्हणाले.
मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी वस्तुस्थिती व आकडेवारी नीट समजत असलेल्या व्यक्तींकडूनच सल्ला घ्यावा आणि तारखा आणि वर्षांची गफलत करणे थांबवावे. डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोहरबाब आणि रवींद्रबाबांची शताब्दी 2025 मध्ये सुरू होत असल्याचा दावा केला होता तेव्हा मी गेल्या विधानसभा अधिवेशनात त्यांची चूक दाखविली होती, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
सरदेसाई आणि केळेकर यांच्या जन्मशताब्दीचा सरकारने तात्काळ वर्षभराचा कार्यक्रम तयार करावा. यामध्ये त्यांच्या साहित्याचा इतर भाषांमध्ये प्रचार करणे, साहित्य संमेलने आयोजित करणे, त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणे आणि गोवा विधानसभेच्या संकुलात त्यांना योग्य सन्मान देणे यांचा समावेश असावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
…