‘हा’ तर अंत्योदयाचा अंत : युरी
मडगाव :
मनरेगा अंतर्गत दररोज 322 रुपये कमावणाऱ्या सुमारे 8000 कामगारांना गेल्या 5 महिन्यांपासून त्यांचे हक्काचे पैसे मिळालेले नाहित. यावरुन भाजप सरकारची प्रशासकीय आणि आर्थिक दिवाळखोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप सरकारकडून “अंत्योदयाचा अंत” होत आहे, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
गरीब व कष्टकरी कामगारांची सर्व प्रलंबित थकबाकी त्वरित फेडण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब हस्तक्षेप करावा. आपल्या दैनंदिन कमाईने मुलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या कष्टकरी कामगारांची देयके प्रलंबित ठेवण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
Administrative & Financial Bankruptcy of @BJP4Goa Govt. again stands exposed with almost 8000 workers earning ₹322 per day under MGNREGA not paid their rightful dues for last 5 months. I demand immediate intervention of @goacm to release all pending dues. Ant(अंत) of Antyodaya! pic.twitter.com/HH1DNqNv8X
— Yuri Alemao (@Yurialemao9) October 17, 2023
गरीब कामगार रोजंदारीसाठी घाम आणि रक्त गाळतात. पण असंवेदनशील भाजप सरकारकडून त्यांची रोजची मजुरी वेळेत देण्याची तसदी घेतली जात नाही हे धक्कादायक आहे. भाजप सरकार कोणत्याही आर्थिक मंजुरीशिवाय इव्हेंट आयोजनावर करोडो रुपये खर्च करते पण गरीब कामगारांना पगार देण्यात आडकाठी आणते, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
गोव्यात 51000 नोंदणीकृत मनरेगा कामगार असून त्यापैकी 39000 कार्डधारक आहेत. राज्यात जवळपास 8000 सक्रिय कार्डधारक कामगार आहेत. यातले जवळपास 42.45 टक्के कामगार हे अनुसूचित जमातीचे आहेत तर 2.48 टक्के अनुसूचित जातीचे आहेत. एसटी आणि एससी समाजाची सतावणूक करण्याच्या भाजप सरकारच्या रणनीतीचा हा भाग आहे का? असा सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे.
नोंदणीकृत मनरेगा कामगारांना किमान 100 दिवस काम देणे सरकारला बंधनकारक आहे. दुर्दैवाने, अनेक कामगारांना 100 दिवसही काम मिळत नाही. विविध प्रकल्प आणि कामांना वेळेत मंजुरी देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याने गरीब मंजुरांवर उपासमारीची पाळी येते, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
भाजप सरकारकडे कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी भरपूर पैसा आहे पण गरजू आणि गरीबांना मदत करताना त्यांची तिजोरी रिकामी होते, असा टोला युरी आलेमाव यांनी शेवटी हाणला.