राज्यपालांनी थोपटली युरी आलेमाव यांची पाठ
कुंकळ्ळी :
कुंकळ्ळी मतदारसंघाला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभले आहे. चांदर हे भारतातील सुंदर गावांपैकी एक आहे. मी निश्चितपणे लोक प्रतिनीधिनी व्यक्त केलेल्या समस्यांकडे लक्ष देईन आणि कुंकळ्ळी मतदारसंघातील विकास कामांबाबत सरकारशी बोलेन, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी केले.
कुंकळ्ळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना चांदर क्लब येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते व स्थानिक आमदार युरी आलेमाव, कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, अतिरिक्त जिल्हाधिकारी परेश फळदेसाई, उपजिल्हाधिकारी उदय प्रभुदेसाई, जि.प.सदस्या संजना वेळीप, फा. जीन दा क्रूझ फर्नांडिस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकशक्ती सर्वोच्च आहे. सरकारी पदावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे लोकसेवा करणे हे कर्तव्य आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे हे आपले ध्येय असले पाहिजे. वैमानिक असलेल्या कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी लोकांच्या सेवेस कार्यरत राहण्यासाठी आपला विमान पायलटचा व्यवसाय सोडला याचा मला अभिमान आहे असे राज्यपाल पिल्लई म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी बोलताना, २०१२ पासुन कुंकळ्ळी मतदारसंघ विकास आणि प्रगतीपासून दूर राहिल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. कुंकळ्ळी मतदारसंघात अद्यावत आरोग्य केंद्राची गरज आहे, सरकारने कुंकळ्ळीच्या सुशिक्षित तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. हेरिटेज टुरिझम अंतर्गत चांदर गाव पुढे आणणे आवश्यक आहे तसेच देमानी-कुंकळ्ळीच्या पारंपारिक चितारी कलेला सरकारी मदत मिळणे आवश्यक आहे, असे युरी आलेमाव यांनी आपल्या भाषणात सांगितले. राष्ट्रीय महामार्ग ६६ ला प्रस्तावित बायपास संरेखित करताना लोकांची घरे वाचवण्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
माकाझानाचे सरपंच आग्नेलो डिकोस्टा आणि पारोडाच्या सरपंच मनीषा नाईक, गिरदोलीचे कार्यकारी सरपंच जुआंव पिशोट, चांदरचे पंच सदस्य डेरेक पेरैरा यांनी त्यांच्या पंचायतींमधील विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी निवेदने राज्यपालांना सादर केली. चांदरचे सरपंच एस्टेफानियो डायस यांनी स्वागतपर भाषण केले.
राज्यपालांनी कुंकळ्ळी मतदारसंघातील दहा कॅन्सर आणि नऊ डायलिसिस रुग्णांना आर्थिक सहाय्याचे धनादेश वितरित केले आणि उर्वरित धनादेश लवकरच जारी केले जातील, असे आश्वासन दिले.
स्थानिक पारंपारिक कलेला चालना देण्याच्या प्रयत्नात, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यपालांना देमानी-कुंकळ्ळीच्या चितारींनी बनवलेल्या “पारंपारीक पाट” ची जोडी भेट दिली व सदर कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारला सुचना करण्याची राज्यपालांना विनंती केली.
राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी कुंकळ्ळी येथील चीफटेन्स स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. चांदर येथील वारसा स्थळ असलेल्या ब्रागांझा हाऊसलाही त्यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रीटा पिल्लई, आमदार युरी आलेमाव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.