भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोवा मनोरंजन सोसायटीच्यावतीने (ईएसजी) गोवा विभागासाठी गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि बिगर वैशिष्ट्य श्रेणीत येथील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या चित्रपटांचा समावेश केला आहे. त्यात दोन्ही विभागांमध्ये एकूण २५ प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी १४ चित्रपट ज्युरी समितीने निवडले आहेत.
कमल स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीचे सदस्य संजीव कुरूप व इतर भारतीय चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांनी वरील चित्रपटांची निवड केली आहे. गोव्यातील निर्माते, दिग्दर्शकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘गोवन डायरेक्टर्स कट’ नावाचा एक नवीन विभाग सुरू केला आहे.
निवडलेले चित्रपट असे : निवडक दिग्दर्शक : खरवण (नित्या नावेलकर), हँगिग बाय ए थ्रेड (अक्षय पर्वतकर), गुंतता हृदय हे (साईनाथ उस्कईकर), माई (एस. शेट्ये). गोव्यातील निर्मात्यांचे चित्रपट : प्रारब्ध (जय आमोणकर दिग्दर्शित), कलखी वात (शिरीष राणे दिग्दर्शित), मेमरीज ऑफ द मँगीफेरा (हिमांशू सिंग दिग्दर्शित), आयज माका फाल्या तुका (श्रीजीत कर्णवार दिग्दर्शित), आदेयुस (नेहल चारी आणि आदित्य स्वरूप दिग्दर्शित), आसरो-श्रम धामची कथा (साईनाथ उस्कईकर दिग्दर्शित), ए सायलेंट बलिदान : गोवा लिबरेशनची अनटोल्ड स्टोरी (निखिल दीक्षित दिग्दर्शित), जीवन योगी : रवींद्र केळेकर (दिलीप बोरकर दिग्दर्शित), एक कप च्या! (किशोर अर्जुन दिग्दर्शित), फेमसली फाऊंड @१५! (सावियो डी नोरोन्हा दिग्दर्शित).
दरम्यान, गोवा राज्य चित्रपट महोत्सव सोसायटी मार्च २०२५ मध्ये गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५च्या १०व्या, ११व्या आणि १२व्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. हा महोत्सव द्विवार्षिक महोत्सव असेल, ज्यामध्ये गोवा राज्यात निर्मित वैशिष्ट्यपूर्ण आणि बिगर वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा समावेश असेल. १०व्या आवृत्तीमध्ये १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत निर्मित, ११व्या आवृत्तीमध्ये १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत निर्मित, तर १२व्या आवृत्तीसाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्मित झालेल्या चित्रपटांचा समावेश असेल.