google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
Homeसिनेनामा 

मायकेल डग्लस यांना IFFIचा ‘सत्यजित रे जीवनगौरव’ प्रदान

गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते आणि निर्माते मायकेल डग्लस यांना चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या  सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने आज गौरवण्यात  आले.

डग्लस यांनी त्यांची जोडीदार बाफ्टा पुरस्कार विजेती प्रख्यात अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती कॅथरीन झेटा जोन्स आणि त्यांचा मुलगा आणि अभिनेता  डिलन डग्लस यांच्यासह इफ्फी  54 च्या शानदार समारोप सोहळ्यात  हा पुरस्कार स्वीकारला.

 

मायकेल डग्लस यांना त्यांच्या काळातील गाजवलेल्या भूमिकांसाठी ओळखले जाते. समाज सेवा आणि चिरकाल सांस्कृतिक प्रभावासाठी समर्पित डग्लस पुरस्कार मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले , “हा पुरस्कार मिळणे हा एक मोठा सन्मान आहे, कारकीर्दीतील मोठे  यश आहे. जेव्हा मी पुरस्काराबद्दल ऐकले तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला.”

परस्पर भिन्न कलात्मक सांस्कृतिक अभिव्यक्ती असलेल्या लोकांना एकत्र आणण्याची आणि बदलण्याचे सामर्थ्य सिनेमात आहे असे मत डग्लस यांनी व्यक्त केले. दोन वेळचे  ऑस्कर पुरस्कार विजेते  डग्लस यांनी जागतिक सिनेमाची भाषा ही पूर्वीपेक्षा अधिक जागतिक झाली असल्याकडेही लक्ष वेधले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) म्हणजे चित्रपट निर्मितीप्रक्रियेतील मंतरलेपणाची पुनर्अनुभूती करून देणारा आणि परस्पर भिन्न सांस्कृतिक कलात्मक अभिव्यक्ती ओलांडत, काळ, भाषा आणि भौगोलिक परिस्थितीच्या पलीकडे घेऊन जाणारा अनुभव असल्याचं ते म्हणाले.

आरआरआर, ओम शांती ओम आणि लंच बॉक्स हे आपले आवडते भारतीय चित्रपट असल्याचं सांगून, डग्लस यांनी भारतीय चित्रपटसृष्टीबद्दलचं आपलं आकार्षण व्यक्त केले.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मायकेल डग्लस यांच्या पत्नी कॅथरीन झेटा जोन्स यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. भारतात मिळालेली आपुलकी आणि आदरातिथ्यानं आपण भारावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात  50 वर्षांहून अधिक काळ सक्रिय असलेले मायकेल डग्लस यांना   2 ऑस्कर, 5 गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स, एक प्राइमटाइम एमी अवॉर्ड आणि इतर असंख्य मानसन्मान मिळाले आहेत.  वॉल स्ट्रीटमधील गॉर्डन गेक्कोच्या अकादमी पुरस्कार विजेत्या भूमिकेपासून ते फॅटल अट्रॅक्शन, द अमेरिकन प्रेसिडेंट, बेसिक इन्स्टिंक्ट, ट्रॅफिक आणि रोमान्सिंग द स्टोन यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांच्या दमदार कामगिरीपर्यंतचा सिनेमावरील त्यांचा  प्रभाव  दिसून येतो.

दिग्गज  अभिनेते मायकेल डग्लस यांनी त्यांच्या अतुलनीय प्रतिभेने आणि त्याच्या कलेप्रति बांधिलकीने जगभरातील प्रेक्षकांना मोहित केले आहे. अभिनया व्यतिरिक्त डग्लस यांनी  वन फ्लू ओव्हर द ककूज नेस्ट, द चायना सिंड्रोम आणि द गेम सारख्या निर्मितीतून उल्लेखनीय कामगिरी केली  आहे. संयुक्त राष्ट्र शांतीदूत असलेले डग्लस ,अण्वस्त्र प्रसार रोखणे आणि लहान आणि हलक्या शस्त्रांचा अवैध व्यापार थांबवणे, यासह निःशस्त्रीकरणाच्या मुद्द्यांप्रति वचनबद्ध आहेत.

चित्रपटसृष्टीतील असामान्य योगदानाबद्दल दिला जाणारा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी मार्टिन स्कोर्सेसे, बर्नार्डो बर्टोलुची, दिलीप कुमार, कार्लोस सौरा, क्रिझिस्टोफ झानुसी आणि वोंग कार-वाई यांसारख्या दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे, ज्यांच्या अतुलनीय योगदानाने सिनेमॅटिक परिदृश्य समृद्ध केले आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या अतुलनीय प्रतिभेने आणि कलेशी असलेल्या बांधिलकीने  जगभरातील प्रेक्षकांना मोहित करणाऱ्या मायकेल डग्लस यांचा गौरव आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!