‘डिसेंबर 2026 पर्यंत गोव्यात नवे कॅन्सर इस्पितळ उभारणार’
बांबोळी येथील गोमेकॉ परिसरात आकाराला येणारे नवे कर्करोग उपचार इस्पितळ डिसेंबर २०२६ पर्यंत लोकांसाठी उपलब्ध होईल. त्यासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळाशी मनुष्यबळ प्रशिक्षणाचा करार करण्यात आला असून, प्रशिक्षणही सुरू झाले आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासात कधी नव्हे एवढी आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे दर्शन यातून होते.
लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्याकरिता वैद्यकीय शिक्षणाच्या ७५ हजार जागा वाढविण्याचे लक्ष्य नजरेसमोर ठेवण्यात आले आहे. औषध उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर कर सवलती दिल्या आहेत.
यामागे सर्वसामान्यांविषयी सरकारला वाटणारा कळवळाच आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने पेडणे समाज आरोग्यकेंद्रातील सुविधा वाढविण्याकडे सरकार लक्ष पुरवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.