
Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा राजीनामा
गेल्या दोन दिवसांपासून Nepal नेपाळमधील Gen Z आणि मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यांवर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. आधी सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध या तरुणाईनं केला. त्यावर १९ तासांनी ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
नेपाळ (nepal) सरकारमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात होता. मात्र, आंदोलन हिंसक होत असल्याचं पाहून पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. “सध्या निर्माण झालेल्या समस्येवर राजकीय मार्गांनी आणि शांततापूर्ण पद्धतीने तोडगा निघावा म्हणून मी पदाचा राजीनामा देत आहे”, असं ओली यांनी जाहीर केलं आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे ओली यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
“मला नेपाळच्या राज्यघटनेतील कलम ७६ (२) नुसार पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं गेलं होतं. देशातली सध्याची असामान्य परिस्थिती लक्षात घेता आणि त्यावर राजकीयदृष्ट्या घटनात्मक तोडगा काढण्यासाठीच्या प्रयत्नांना हातभार लागावा म्हणून मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे. नेपाळच्या घटनेच्या कलम ७७ (१) नुसार मी ताबडतोब पदावरून पायउतार होत आहे”, असं या पत्रामध्ये ओली यांनी नमूद केलं आहे.
पंतप्रधानांचं शासकीय निवासस्थान पेटवलं!
दरम्यान, नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली. सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच कर्फ्यू असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराविरोधात वातावरण तापू लागलं होतं. विरोधकांनीदेखील सरकारच्या भ्रष्टाचारावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्याअनुषंगाने नेपाळी जनतेमधूनही या प्रकारांना विरोध केला जाऊ लागला. त्यातच सोमवारी नेपाळ सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब, एक्स अशा सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे संतप्त झालेले तरुण रस्त्यावर उतरले. त्यात Gen Z वयोगटातील नवतरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. पहिल्यांदाच नेपाळमधील Gen Z अशा प्रकारे उत्स्फूर्तपणे एखाद्या आंदोलनात सहभागी झाले होते.
नेपाळमध्ये ठिकठिकाणी या तरुणांनी सरकारी धोरणांविरोधात निदर्शने करायला सुरुवात केली. “बंदी भ्रष्टाचारावर आणा, समाजमाध्यमांवर नाही” अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. आंदोलकांचा वाढता रेटा पाहून सरकारने बंदीचा निर्णय मागे घेतला आणि १९ तासांमध्ये ही बंदी उठवण्यात आली. मात्र, यादरम्यान पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी केलेल्या गोळीबारात १९ आंदोलक ठार झाले. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला.