
आबे फारिया रस्ता वारसा रस्ता म्हणून पुनर्स्थापित करा :प्रभव नायक
मडगाव : संमोहन शास्त्राच्या शास्त्रीय अभ्यासाचे जनक आबे फारिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा सरकारला मडगावमधील ऐतिहासिक आबादे फारिया रस्त्याचे पुनरुज्जीवन करून त्याला वारसा रस्त्याचा दर्जा देण्याचे आवाहन केले आहे.
एकेकाळी सिमेंटचा रस्ता आणि वारशाच्या घरांनी सजलेला हा मार्ग फक्त वाहतुकीसाठी नव्हता, तर मडगावच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक होता. मात्र गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याचे सौंदर्य हरवले असून तो एक साधा मार्ग बनून राहिला आहे, असे प्रभव नायक यांनी सांगितले.
ते म्हणाले, “आबे फारिया यांचे योगदान मडगाव किंवा गोव्यात मर्यादित नाही. हिप्नोटिझमच्या शास्त्रीय अभ्यासातील त्यांचे अग्रगण्य कार्य त्यांना जागतिक पातळीवर विचारवंत आणि संशोधकांच्या यादीत नोंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने ओळखला जाणारा हा रस्ता सन्मान, वारसा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असणे आवश्यक आहे.”
मडगांवचो आवाज प्रभव नायक यांनी सांगितले की वारसा जतन करणे हे मडगावच्या शहरी विकास आराखड्याचा अविभाज्य भाग असले पाहिजे. आबा दे फारिया रस्त्याला वारसा रस्ता म्हणून विकसित केल्यास या महान गोमंतकीयाला खरी श्रद्धांजली वाहिली जाईल आणि सामाजिक अभिमानही वृद्धिंगत होईल.
मडगांवचो आवाजने सरकारला विनंती केली आहे की वारसा संवेदनशील रस्त्याचे डिझाईन, घरांचे सौंदर्यीकरण, फुटपाथ आणि सांस्कृतिक फलकांचा समावेश असलेली ठोस व ठराविक वेळेत पूर्ण होणारी योजना तयार करावी, जेणेकरून आबा दे फारिया रस्ता हा त्यांच्या वारशाला साजेसा खरा सांस्कृतिक ठेवा ठरेल.