‘पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीने विकसित भारताचा पाया घातला’
पणजी :
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भाबा अणु संशोधन केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इतर अनेक संस्थांची देशात स्थापना झाली. त्यांनीच खरेपणी विकसित देशाचा पाया घातला असे उद्गार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काढले.
काँग्रेस भवन, पणजी येथे काँग्रेस पक्षातर्फे आयोजित पंडित नेहरू जयंती सोहळ्यात ते बोलत होते. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसीस सार्दिन, हळदोणचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे गोव्यावर विशेष प्रेम होते. गोव्याच्या अस्मितेची त्यांना नेहमीच काळजी असायची. तथ्यात्मक इतिहास हे स्पष्ट करतो की पंडित नेहरूंचा गोवा मुक्ती, जनमत कौल यांवर प्रभाव आहे. त्यांच्या दूरदृष्टीचे रुपांतर कालांतराने गोव्याला घटकराज्य दर्जा मिळण्यात झाले असे कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रांसीस सार्दिन म्हणाले की, पंडित नेहरू हे जागतिक नेते होते ज्यांनी जागतिक स्तरावर आदर मिळवला. त्यांची विचारधारा आणि व्हिजन पाळणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते, असे सार्दिन यांनी सांगीतले.
माजी उपसभापती शंभूभाऊ बांदेकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष एम.के. शेख यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानावर भाष्य केले. आर्कीटेक्ट तुलियो डिसोजा यांनीही भारताच्या पहिल्या पंतप्रधानांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला सुभाष फळदेसाई, गुरुदास नाटेकर, सावियो डिसोझा, अर्चित नाईक, सुदिन नाईक आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.