मडगावातील हल्ला हि चोरी नव्हे, तर तो खुनाचा प्रयत्न : प्रभव नायक
मडगाव : मडगाव शहरात एका महिलेवर झालेल्या अमानुष हल्ल्याला पोलीस चोरीचा प्रकार म्हणून रंग देत असले, तरी हा हल्ला स्पष्टपणे खुनाचा प्रयत्न आहे आणि तात्काळ “खुनाचा प्रयत्न” या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणे अक्षरशः ताब्यात घेऊन मडगाव शहराला अराजकतेकडे नेणाऱ्या समाजविघातक घटकांपासून शहर मुक्त करण्यासाठी तातडीची कारवाई आवश्यक आहे, अशी मागणी मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.
मडगावकर आता केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही असुरक्षित झाले असून महिला व ज्येष्ठ नागरिक भयभीत अवस्थेत जगत आहेत. ही वाढती असुरक्षितता म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा संपूर्ण ऱ्हास आणि सामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यात शासनाचे अपयश असल्याचे ते म्हणाले.
गेल्या दीड वर्षांपासून मडगावातील बिघडत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत आपण सातत्याने आवाज उठवत असून, वेळेत उपाय न केल्यास अशा गंभीर घटना घडणारच, असा इशारा दिला होता, असे प्रभव नायक यांनी सांगितले. मात्र, वारंवार सूचना देऊनही सरकार पूर्णपणे असंवेदनशील व उदासीन राहिले, असा आरोप त्यांनी केला.
पीडित महिलेच्या घरी भेट दिल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी भीतीपोटी ती दुसऱ्या नातेवाइकांकडे राहायला गेल्याची माहिती दिली. गुन्हेगार मोकाट फिरत असताना पीडितांना आपले घर सोडावे लागणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. त्यांनी पीडितेच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
या गंभीर घटनेवर मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी अद्याप मौन बाळगले असून, हे मौन अत्यंत निषेधार्ह असल्याचे प्रभव नायक म्हणाले. मडगावच्या आमदाराने साधे निषेधाचे विधानही न करणे म्हणजे मडगावकरांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण उदासीनता दर्शवते, असा आरोप त्यांनी केला.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी ते रात्री १० वाजता झोपतात आणि त्यानंतर मडगावात काय घडते याची त्यांना पर्वा नाही, तसेच मडगाव स्टेशन रोडवरील उपद्रवींवर पोलीस कारवाई फक्त रात्री ९ वाजेपर्यंतच करावी, असे जाहिर वक्तव्य यापूर्वी केले आहे याची आठवण प्रभव नायक यांनी करुन दिली. आमदारांच्या अशा वृत्तीमुळे समाजविघातक घटकांचे मनोबल वाढले असून, आणखी हिंसक घटना घडण्याआधी ही परिस्थिती तात्काळ बदलली पाहिजे, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली.


