सिनेनामा 

पेरणोलीचा प्रकाश पोहोचला बॉलिवूडमध्ये… 

'मयसभा'सह दोन हिंदी सिनेमांची केली कार्यकारी निर्मिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
मूळचा पेरणोली गावातील आणि गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये स्थिरावलेल्या प्रकाश नावलकर याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपल्या कामाची चमक दाखवली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या सध्या गाजत असलेल्या ‘मयसभा’ या जावेद जाफरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या हिंदी सिनेमाचा कार्यकारी निर्माता म्हणून प्रकाशला विशेष नावाजले जात आहे.
आजरा तालुक्यातील पेरणोली गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रकाशने आजरा महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याने आपल्यातील कलागुणांची चुणूक दाखवली होती. महाविद्यालयात तसेच शिवाजी विद्यापीठात आयोजित विविध उपक्रमात, एकांकिकेत आणि नृत्य सादरीकरणात त्याने सहभाग घेत कौतुक कमावले होते. पुढे नोकरीसाठी मुंबईला गेल्यानंतरही त्याच्यातील कलाकार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. तेव्हा अशोक हांडे यांच्या आझादी ५० आणि इतर संगीत-नृत्य-नाट्य सादरीकरणात त्याचप्रमाणे अजित भगत यांच्या नाट्यसंस्थेत त्याने सहभाग घेतला. त्याचवेळी त्याची ओळख शामराव यादव यांच्यासोबत झाली. सोबत काम करत असताना त्याच्यामध्ये कलेप्रती असलेली तळमळ शामरावांना कळाली, आणि त्यांनी
अस्तोनिया एंटरटेनमेंट या आपल्या सिनेनिर्मिती संस्थेचा कार्यकारी निर्माता म्हणून प्रकाशला नियुक्त केले.
mayasabha director
प्रकाशने अस्तोनिया एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सुरुवातीला ‘रेनकोट’ या वेधक लघुपटाची कार्यकारी निर्मिती केली. या लघुपटाला राष्ट्रीयस्तरावरील सिनेमहोत्सवात विविध पारितोषिके प्राप्त झाली असून, त्यानंतर शामरावांनी एकाचवेळी मयसभा आणि द स्टेअरिंग या दोन हिंदी आणि बडे अब्बू या कोंकणी पूर्ण लांबीच्या सिनेमाची निर्मिती केली. या तिन्ही सिनेमाची कार्यकारी निर्मिती प्रकाशने केली असून, बडे अब्बू आणि स्टेरिंगमध्ये त्याने लक्षवेधी भूमिकादेखील केली आहे. तसेच या सिनेमातील महत्वाच्या भागाचे आणि एका गाण्याचे चित्रीकरण प्रकाशने आजरा परिसरात आवर्जून करत, आपल्या भागाला मोठ्या पडद्यावर झळकवण्याचा मानदेखील पटकवला आहे.
त्याचप्रमाणे, त्याने प्रमुख भूमिका केलेला यशोदा हा मराठी लघुपट २०२४ मध्ये गोव्यातील भारताच्या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवातदेखील प्रदर्शित झाला होता. कलाकार आणि कार्यकारी निर्माता म्हणून प्रकाशचे काम सध्या बॉलिवूडमधील नामवंतांनी विशेष आवडत असून, तो देखील आपल्या या सगळ्या प्रवासावर समाधानी दिसत आहे.
पेरणोलीतून मुंबईत मी खूप स्वप्ने घेऊन आलो होतो. सुरुवातीच्या काळात नोकरी आणि त्याचबरोबर कलाक्षेत्रात स्थिरावण्यासाठी मी धडपड करत होतो. विविध नाट्यसंस्था आणि सिनेनिर्मिती संस्था यांच्यासोबत मी आता संलग्नित असलो तरी आजची स्ट्रगल सुरूच आहे. सिनेमाचा कार्यकारी निर्माता जरी झालो असलो तरी, माझा मूलतः ओढा कला सादरीकरणाकडे आहे. आणि त्यासाठी प्रयत्न आणि नोकरी सांभाळून नवे नवे शिक्षण मी या काळात घेत आहे.
प्रकाश नावलकर,
कार्यकारी निर्माता आणि कलाकार

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!