
स्मार्ट मीटर प्रकल्पाबद्दल वीजमंत्री देत आहेत विरोधाभासी माहिती : प्रभव नायक
मडगाव : राज्यातील स्मार्ट मीटर प्रकल्पाच्या खर्चाबाबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि विधानसभेत दिलेल्या उत्तरातील माहिती यामध्ये स्पष्ट विरोधाभास दिसत असल्याचा आरोप युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडून तातडीने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.
नायक यांनी म्हटले की, माध्यमांसमोर बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर स्मार्ट मीटर प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळणार असल्याचे सांगतात. मात्र, जुलै २०२५ मध्ये गोवा विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ढवळीकर यांनी वेगळीच आकडेवारी मांडली आहे.
विधानसभेतील अधिकृत उत्तरानुसार, या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ८९० कोटी रुपये असून त्यापैकी केवळ ७०.११ कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. उर्वरित तब्बल ८२०.०१ कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य सरकारवर पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हा खर्च ९३ महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने भरायचा असला तरी शेवटी तो जनतेवरच पडणार असल्याचा दावा नायक यांनी केला.
दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना वीजमंत्र्यांनी आरडीएसएस (RDSS) योजनेचा उल्लेख केला होता. मात्र, विधानसभेतील उत्तरात या योजनेचा कोणताही उल्लेख नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे नायक यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, स्मार्ट मीटर प्रकल्पाचा खरा आर्थिक आराखडा काय आहे आणि त्याचा अंतिम भार नेमका कोणावर पडणार, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नायक यांनी केली. गोव्याच्या नागरिकांना या महत्त्वाच्या विषयावर पारदर्शक माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

