“डिझाईन म्हणजे सकारात्मक प्रभाव टाकणारी प्रगल्भ विचारप्रणाली”
प्रा. सुधाकर नाडकर्णी यांच्या ‘बाय डिझाईन : वर्क अँड थॉट्स’चे थाटात प्रकाशन
पुणे :
भारतात डिझाईन आणि डिझाईन शिक्षणाची नवी दृष्टी रुजवणारे ज्येष्ठ डिझाईन विचारवंत प्रा. सुधाकर नाडकर्णी यांच्या ‘बाय डिझाईन : वर्क अँड थॉट्स’ (By Design : Work and Thoughts) या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात झाले. वयाच्या ९३ व्या वर्षीही तितक्याच जोमाने कार्यरत असलेल्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा ठरला.
डिझाईन क्षेत्रात सातत्याने नवे उपक्रम राबवत प्रा. नाडकर्णी यांनी भारतात डिझाईन शिक्षणाची स्वतंत्र संस्कृती रुजवली. आयआयटी मुंबई आणि आयआयटी गुवाहाटी येथे इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर (IDC) स्थापन करून त्यांनी डिझाईन शिक्षणाला नवी दिशा दिली. पुढे ‘डिझाईन थिंकिंग’ आणि ‘बिझनेस डिझाईन’ या संकल्पनांद्वारे व्यवस्थापन शिक्षणातही नाविन्यपूर्ण विचारप्रणाली रुजवण्याचे कार्य त्यांनी केले.
या कार्यक्रमाला जेजे स्कूलमधील त्यांचे सहाध्यायी, माजी विद्यार्थी, देशातील आघाडीचे डिझायनर्स, नाडकर्णी कुटुंबीय तसेच डिझाईनचे शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाडकर्णी यांच्या ‘डिझाईन घराण्या’च्या तीन पिढ्या एकत्र आल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप लाभले.
प्रा. कीर्ती त्रिवेदी यांनी यावेळी बोलताना इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची उभारणी आणि त्यामागील प्रा. नाडकर्णी यांची दृष्टी उलगडून सांगितली. “पारंपरिक अभियांत्रिकी शिक्षणाला छेद देत देशात डिझाईन शिक्षणाची नवी संस्कृती रुजवणारे प्रा. सुधाकर नाडकर्णी हे या क्षेत्राचे खरे अध्वर्यू आहेत. डिझायनर हा केवळ सेवा पुरवणारा नसून औद्योगिक आणि सामाजिक समस्या सोडवणारा व्यावसायिक असतो, हा विचार त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवला,” असे त्यांनी नमूद केले.
चित्रपट दिग्दर्शक अनिल झणकर यांनी घेतलेल्या संवादात्मक मुलाखतीतून प्रा. नाडकर्णी यांच्या कार्याचा आणि विचारांचा वेध घेण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. नाडकर्णी म्हणाले, “डिझाईन म्हणजे केवळ वस्तूंना आकार देणे किंवा सुशोभीकरण नव्हे; तर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणारी ती एक प्रगल्भ विचारप्रणाली आहे. खरे डिझाईन शिक्षण हे एकतर्फी व्याख्यानातून नव्हे, तर मुक्त चर्चेतून घडते. तरुणांसाठी डिझाईन क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. नाविन्य आणि सतत नवे अनुभव हे या क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे.”
जर्मनीमध्ये घेतलेले डिझाईन शिक्षण, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधील कार्य, आयआयटी मुंबई आणि आयआयटी गुवाहाटी येथे डिझाईन सेंटरची स्थापना, तसेच वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘डिझाईन थिंकिंग’च्या माध्यमातून व्यवस्थापन शिक्षणाला दिलेले नवे आयाम या त्यांच्या प्रवासाचा उलगडा या मुलाखतीतून झाला.
जगप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांच्यासह सॉल्ट लेक सिटी सेंटरच्या डिझाइनमध्ये पारंपरिक कालीघाट चित्रशैलीचा वापर, चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीच्या रचनेत पर्यावरणीय विचारांचा समावेश, तसेच ‘विस्तार’ या फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी भारतीय वास्तुकलेवरील प्रदर्शनाच्या संकल्पना अशा विविध प्रकल्पांमधील त्यांचे योगदानही यावेळी उलगडले.
‘बाय डिझाईन : वर्क अँड थॉट्स’ या पुस्तकात प्रा. नाडकर्णी यांच्या गेल्या सहा दशकांतील कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. हे पुस्तक केवळ केस स्टडीजपुरते मर्यादित नसून, डिझाईन शिक्षण, सामाजिक बदल आणि व्यवस्थात्मक विचारप्रणाली यांवर भाष्य करणारा प्रेरणादायी दस्तऐवज असल्याचे मत उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केले. पुस्तकाला चार्ल्स कोरिया यांचा ब्लर्ब लाभला असून डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि संशोधकांसाठी ते मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगण्यात आले.



