गोवादेश/जग

CJP आंदोलन; राजन घाटेंसह सेवा दलाचे कार्यकर्ते ताब्यात

नवी दिल्ली/पणजी : दिल्लीतील शांततापूर्ण आंदोलनादरम्यान गोवा प्रदेश सेवा दलाचे प्रमुख आयोजक राजन घाटे यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्याचा दावा गोवा प्रदेश सेवा दलाने केला आहे. त्यांच्यासह अखिल भारतीय सेवा दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी किसान भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी पारंपरिक सेवा दलाचा गणवेश परिधान करून उपस्थिती लावली होती. कोणतीही पूर्वसूचना किंवा चौकशी न करता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हजरत निजामुद्दीन पोलिस ठाण्यात नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.


प्रसिद्धीपत्रकानुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या नीट (NEET) प्रकरणावरील संसदेत सविस्तर चर्चेच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हे कार्यकर्ते शांततापूर्ण लोकशाही आंदोलनात सहभागी झाले होते.


संघटनेच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतल्यानंतर राजन घाटे यांच्यासह सेवा दलाच्या स्वयंसेवकांना खासगी बसमधून अज्ञात स्थळी हलविण्यात आले. त्यांना कुठे नेले जात आहे, याची कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.


गोवा प्रदेश सेवा दलाने या कारवाईचा निषेध व्यक्त करत, शांततापूर्ण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थी, युवक आणि पारदर्शक, न्याय्य व उत्तरदायी शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी संघटना कटिबद्ध असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!