सिनेनामा 

‘हा’ आहे ​व्हेनिसच्या ओरिझोंटी स्पर्धेतील एकमेव भारतीय चित्रपट

मुंबई : भारतीय दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांचा दुसरा चित्रपट ‘लव्हर्स इन द ब्लू नाईट’ याची ८३व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘ओरिझोंटी’ (Orizzonti) स्पर्धा विभागासाठी निवड झाली आहे. यंदाच्या महोत्सवात स्पर्धा विभागात निवड झालेला हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.

गेल्या वर्षी अनुपर्णा रॉय यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपट ‘साँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’साठी ओरिझोंटी विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावत इतिहास रचला होता. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय दिग्दर्शिका ठरल्या होत्या. त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी त्याच स्पर्धा विभागात त्यांचा दुसरा चित्रपट निवडला जाणे, हा भारतीय स्वतंत्र चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

‘लव्हर्स इन द ब्लू नाईट’ हा चित्रपट मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडतो. एका समलैंगिक विवाहित पुरुषाची, बारमध्ये काम करणाऱ्या त्याच्या एकाकी पत्नीची, छोट्या चोराची आणि दलालाची कथा या चित्रपटात गुंफण्यात आली आहे. प्रेम, स्थलांतर, ओळख, अस्तित्व आणि महानगरातील असुरक्षितता या विषयांचा चित्रपटात वेध घेण्यात आला आहे. चित्रपट हिंदी भाषेत असून त्यात सिल्हेटी बंगाली आणि मराठी भाषांचाही वापर करण्यात आला आहे.

या चित्रपटात नीलिमा शर्मा, प्रीतम पिलानिया, भूषण शिंपी, जतिन सरीन, काजल केशव आणि विनोद सूर्यवंशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाची निर्मिती विकास कुमार, शरीब खान, बिभांशू राय आणि रोमिल मोदी यांनी केली असून, नीरज चुरी कार्यकारी निर्माता आहेत. नवीन शेट्टी सहनिर्माते आहेत. खान अँड कुमार मीडिया यांनी अम्मी मीडियाच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना अनुपर्णा रॉय म्हणाल्या, “‘साँग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज’नंतर ‘लव्हर्स इन द ब्लू नाईट’सह पुन्हा ओरिझोंटी स्पर्धेत परतणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि सन्मानाचा क्षण आहे. हा सन्मान संपूर्ण टीमचा असून अधिक प्रामाणिक आणि धाडसी कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, अशी आशा आहे.”

निर्माते विकास कुमार यांनी सांगितले की, “अनुपर्णा रॉय या त्यांच्या पिढीतील वेगळा सिनेमॅटिक आवाज असलेल्या दिग्दर्शिका आहेत. सलग दुसऱ्या वर्षी त्यांचा चित्रपट व्हेनिसमध्ये स्पर्धेसाठी निवडला जाणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!