देश/जग

सीजेपी आंदोलनाच्या कथित विदेशी फंडिंगबाबत दिशाभूल; परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या दिल्लीतील आंदोलनाला कथित विदेशी निधी मिळाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावरील काही पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून हे दावे करण्यात आल्याचा खुलासा मंत्रालयाच्या ‘फॅक्ट चेक’ विभागाने केला आहे.

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सीजेपीने दिल्लीत महिनाभर आंदोलन केले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. त्यानंतर २५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, आंदोलन सुरू असतानाच या आंदोलनाला विदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला होता.

मात्र, रविवारी परराष्ट्र मंत्रालयाने या दाव्यांचे खंडन केले. मंत्रालयाच्या ‘फॅक्ट चेक’ विभागाने एक्सवरील पोस्टमध्ये, “सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट दिशाभूल करणाऱ्या असून त्यात प्रवक्त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे,” असे स्पष्ट केले.

रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटले होते?

शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत रणधीर जयस्वाल यांना सीजेपीच्या आंदोलनाला कथित विदेशी निधी मिळाल्याच्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी, “या विषयावर माहिती देण्यासाठी सध्या माझ्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही,” एवढेच सांगितले होते. मात्र, या उत्तराचा चुकीचा अर्थ लावत सोशल मीडियावर विविध दावे करण्यात आले, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!