‘अटल सेतूवरील खराब रस्त्याचे मुख्य कारण भ्रष्टाचार’
पणजी:
अटल सेतू पुलावरील खराब रस्त्याचे मुख्य कारण भ्रष्टाचार असल्याचे सांगत गुरूवारी आम आदमी पक्षाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यावर टीका केली.
अलीकडेच सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी अटल सेतू पुलावर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यामागचे कारण शोधण्यासाठी आयआयटी-मद्रासला सांगितल्याचे नमूद केले होते. याशिवाय पावसाळ्यातही खड्डे बुजवणारे नवीन मशिन आणण्याचा त्यांचा विभाग प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
यावर प्रतिक्रिया देताना ‘आप’चे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी अटल सेतूवरील रस्ता निकृष्ट दर्जाच्या अॅडहेसिव्हच्या वापरामुळे खराब झाला असल्याची टिप्पणी केली. नाईक यांच्या म्हणण्यानुसार, एल अँड टी कंपनीला निकृष्ट दर्जाचा अॅडहेसिव्ह वापरल्याने रस्ता खराब होईल याची जाणीव होती. तरीही, त्यांना निकृष्ट दर्जाचा केमिकल वापरण्यास भाग पाडला. पुरवठादारांचे केंद्रीय सरकारसोबत असलेल्या संबंधांमुळे या अॅडहेसिव्ह खरेदीच्या निर्णयावर परिणाम झाला का, असा प्रश्न नाईक यांनी यावेळी उपस्थित केला.
सरकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून वारंवार खड्डे बुजवून गोमंतकीयांना मूर्ख बनवत आहे, अशी टीका नाईक यांनी केली. “आगामी वर्षांत कंत्राटदाराची हमी मुदत संपेल आणि सरकार पुन्हा एकदा रस्ता बांधण्यासाठी सार्वजनिक निधी वापरेल. या समस्येवर एकमेव उपाय म्हणजे सध्याचे डांबर काढून टाकायाला पाहिजे. त्यानंतर योग्य केमिकल वापरून पुन्हा डांबर घातले पाहिजे”, असे नाईक म्हणाले.
आपचे नेते सुनील सिग्नापूरकर म्हणाले की, कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वर्क ऑर्डर देण्यापासून ते हॉट मिक्सिंगपर्यंत लाच द्यावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना लोकांच्या जीवाची काळजी नाही, उलट किती पैसा येईल याचा अंदाज लावण्यातच जास्त रस आहे. त्यामुळे राज्यात निकृष्ट दर्जाचे काम पाहायला मिळत आहे.
आप नेते सेसिल रॉड्रिग्स म्हणाल्या, “सध्या अनेक मुद्दे प्रलंबित आहेत ज्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांहनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, सरकारने सांत इनेज येथील नवीन इमारतीसाठी 22 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जनतेची सेवा करणे हे आद्य कर्तव्य आहे.”