गोवा

‘आप’च्या गोवा कार्याध्यक्षांवर हल्ला; भाजप कार्यकर्त्याविरोधात एफआयआरची मागणी

मडगाव: आम आदमी पक्षाचे (आप) गोवा कार्याध्यक्ष गेर्सन गोम्स यांच्यावर चिंचणी-देवसू​ ग्रामपंचायत कार्यालयात हल्ला झाल्याचा आरोप करत, संबंधित भाजप कार्यकर्त्याविरोधात तातडीने एफआयआर दाखल करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. या प्रकरणी ‘आप’चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक, वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई, आमदार क्रूझ सिल्वा आणि संघटन सचिव प्रशांत नाईक यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ही मागणी केली.

गेर्सन गोम्स हे चिंचणी-देवसूग्रामपंचायतीचे सरपंचही आहेत. ‘आप’च्या म्हणण्यानुसार, माल्कम परेरा याने ग्रामपंचायत कार्यालयात गोम्स यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गोम्स यांना प्रथम बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पक्षाने सांगितले.

पूर्वी धमक्या मिळाल्याचा कुटुंबीयांचा दावा

गोम्स यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, परेरा याच्याकडून गोम्स यांना काही काळापासून धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या; मात्र त्यावर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

या पार्श्वभूमीवर ‘आप’चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला. यापूर्वी धमक्या देण्यात आल्यानंतर हा हल्ला झाल्याचे सांगत, गोव्यात हिंसाचाराचे राजकारण होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘कारवाई न झाल्याने मनोबल वाढले’

वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई यांनी गावकऱ्यांकडून संबंधित व्यक्तीविरोधात यापूर्वी तक्रारी करण्यात आल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी कारवाई केली नसल्याने संबंधिताचे मनोबल वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार क्रूझ सिल्वा यांनीही पोलिसांकडे तक्रारी आणि पुरावे उपलब्ध असूनही कारवाई झाली नसल्याचा दावा केला. संबंधित अधिकारी आणि हल्लेखोर यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

या घटनेप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’च्या नेत्यांनी केली. या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!