
‘२३ वा मजला’ : शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या सस्पेन्स थ्रिलरची उत्सुकता
मुंबई : मराठी रंगभूमीवर सस्पेन्स आणि थ्रिलरचा थरार घेऊन ‘२३ वा मजला’ हे नवे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून विजय केंकरे यांनी दिग्दर्शन केले आहे.
मुंबईतील एका आलिशान गगनचुंबी इमारतीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या ‘२३ वा मजला’मध्ये दोन यशस्वी लेखकांची मैत्री, व्यावसायिक भागीदारी आणि त्यामागे दडलेली रहस्ये यांची कथा मांडण्यात आली आहे. मैत्री, महत्त्वाकांक्षा, लोभ आणि विश्वासघात यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षातून नाटकाचा थरार उलगडत जातो.
शशांक केतकर या नाटकात तरुण लेखकाची भूमिका साकारत आहेत. मालिका, चित्रपट आणि नाटकांसाठी लेखन करणाऱ्या या पात्राच्या आयुष्यात यशासोबतच काही गुपितेही दडलेली आहेत. दोन मित्रांमधील सर्जनशील मतभेद वैयक्तिक संघर्षात बदलल्यानंतर परिस्थिती कशी टोकाला जाते, हे नाटकातून पाहायला मिळणार आहे.
अनिकेत विश्वासराव हे अमित यादव या पुरस्कारप्राप्त लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हुशार आणि यशस्वी लेखक म्हणून ओळख असलेल्या अमितचे खासगी आयुष्य मात्र कर्ज, असुरक्षितता आणि न्यूनगंडामुळे गुंतागुंतीचे झालेले आहे. त्यातून बाहेर पडताना त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे कथेला अनेक धक्कादायक वळणे मिळतात.
सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री, विनोद, गूढ हालचाली आणि अनपेक्षित ट्विस्ट्स यांची सांगड या नाटकात घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना शेवटपर्यंत ‘पुढे काय घडणार?’ याची उत्सुकता कायम राहणार आहे.
‘सवाईगंधर्व’, ‘नाट्यपुष्प’ आणि ‘अथर्व थिएटर’ यांच्या निर्मितीतून हे नाटक साकारत आहे. मयुरी वाघ आणि सुजित देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य, अजित परब यांचे संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना नाटकाला विशेष रंगत आणणार आहे.





