कर्नाटकात टाटा पॉवरचा ३०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प
कोप्पल येथील प्रकल्पातून दरवर्षी ८१० दशलक्ष युनिट वीजनिर्मिती; कार्बन उत्सर्जनातही घट होणार
मुंबई : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने (टीपीआरईएल) कर्नाटकातील कोप्पल येथे ३०० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. सौर ऊर्जा महामंडळासाठी (एसईसीआय) उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ८१० दशलक्ष युनिट (एमयू) वीज निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे दरवर्षी अंदाजे १ लाख ३ हजार ८२० टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असल्याचा कंपनीचा दावा आहे.
टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टीपीआरईएलची संपूर्ण मालकीची उपकंपनी टीपी सौर्या ही या प्रकल्पाची विकासक कंपनी आहे. प्रकल्पात सौर पॅनेल्सना सूर्याच्या हालचालीनुसार दिशा बदलता यावी, यासाठी विशेष सोलर ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करून वीजनिर्मितीची कार्यक्षमता वाढवता येते.
प्रकल्पात TP580HG10NB प्रकारच्या बायफेशियल सोलर मॉड्यूल्सचा वापर करण्यात आला आहे. या मॉड्यूल्समुळे पॅनेलच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूंनी सौर ऊर्जा ग्रहण करता येते. सोलर ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि उच्च कार्यक्षमतेच्या मॉड्यूल्सच्या एकत्रित वापरामुळे उपलब्ध जागेचा अधिक प्रभावी वापर होऊन वीजनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महिलांचाही महत्त्वपूर्ण सहभाग आहे. प्रकल्पस्थळी कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४० टक्के महिला आहेत. एकूण १६ महिला साइट मॅनेजर आणि साइट इंजिनिअर यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असून, अभियांत्रिकी, तांत्रिक अंमलबजावणी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर टीपीआरईएलची एकूण अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता १२ गिगावॅटवर पोहोचली आहे. यापैकी सुमारे ७.२ गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून, उर्वरित सुमारे ४.९ गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प विविध अंमलबजावणीच्या टप्प्यांत आहेत. कार्यान्वित क्षमतेमध्ये ५.८ गिगावॅट सौर आणि १.३ गिगावॅट पवन ऊर्जा क्षमतेचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
मोठ्या क्षमतेचे अक्षय ऊर्जा प्रकल्प, आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपाययोजनांच्या माध्यमातून भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला हातभार लावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.



