प्रभव नायक यांनी पुन्हा एकदा केला मडगावातील सांडपाण्याच्या समस्येचा पर्दाफाश
मडगाव : “मडगावचे आमदार आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी मडगावातील सांडपाण्याच्या गळतीच्या समस्येत आरोग्य खात्याच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचे सांगताना, या समस्येचे गंभीर सार्वजनिक आरोग्यावरील परिणाम सोयीस्करपणे दुर्लक्षित केले. परंतू, आता गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या मडगावातील दुकानदारांनी समोर आणलेली ही वस्तुस्थिती व धक्कादायक वास्तव त्यांचे डोळे उघडेल,” असा सणसणीत टोला मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी हाणला आहे. मडगावातील एका निवासी तसेच व्यावसायिक संकुलात सांडपाणी तुंबून बाहेर वाहत असल्याचा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला.
प्रभव नायक यांनी आज स्वतः मडगावातील वर्दे वालावलीकर रस्त्यावरील दुकानदारांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतली. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे सांडपाणी तुंबून वाहत असल्याने दुकानदारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आरोग्य खाते, मडगाव नगरपालिकेसह संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
मडगावातील आकें तसेच इतर भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असताना, सांडपाण्याची अशी दयनीय अवस्था सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे प्रभव नायक यांनी नमूद केले. डासांची उत्पत्ती रोखणे आणि स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे असताना, प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. त्यांनी आरोग्य खाते, नगरपालिका प्रशासन आणि सीवरेज कॉर्पोरेशन यांच्याशी स्वतः संपर्क साधून तातडीच्या हस्तक्षेपाची तसेच कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी केली.
कोंबा येथील सांडपाण्याच्या समस्येबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे निवेदन सादर केल्यानंतर, आरोग्य खाते, मडगाव नगरपालिका आणि सीवरेज कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त पाहणीचे आदेश मंत्र्यांनी दिले होते, याची प्रभव नायक यांनी आठवण करून दिली. मात्र, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मध्येच हस्तक्षेप करून सांडपाण्याची गळती हा पायाभूत सुविधांशी संबंधित विषय असून आरोग्य खात्याची त्यात भूमिका नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर प्रस्तावित पाहणी रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य यांची फारकत कशी करता येईल? सार्वजनिक ठिकाणी सांडपाणी वाहत असताना आणि मडगावच्या विविध भागांत डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना आरोग्य खाते आपली जबाबदारी कशी झटकू शकते? पायाभूत सुविधांमधील अपयशाचे कारण पुढे करून नागरिकांच्या आरोग्याला असलेले गंभीर धोके दुर्लक्षित करता येणार नाहीत. जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याऐवजी सर्व संबंधित खात्यांनी समन्वयाने काम केले पाहिजे,” असा सवाल प्रभव नायक यांनी उपस्थित केला.
वर्दे वालावलीकर रस्ता तसेच मडगावातील इतर बाधित भागांतील सांडपाण्याची समस्या तातडीने सोडविण्यासाठी मडगाव नगरपालिका आणि सीवरेज कॉर्पोरेशन यांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी प्रभव नायक यांनी केली. राजकीय हस्तक्षेप आणि खात्यांमधील जबाबदारी टाळण्याच्या प्रकारांमुळे मडगावकरांना वेठीस धरता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “राजकीय अहंकारापेक्षा नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. मडगावकरांना सबबी नव्हे, तर ठोस उपाय हवे आहेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
