google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कास धरणाच्या डिजाईनमध्येच ‘भुशी’ डॅमचा अंतर्भाव

सातारा (महेश पवार) :
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळेच कास धरण उंची वाढवण्याचा प्रकल्प मार्गी लागला हे सर्वश्रुत आहे. दरम्यान, ज्यावेळी या प्रकल्पाचे डिजाईन तयार करण्यात आले होते, त्यावेळीच या धरणाच्या सांडव्याला भुशी डॅमच्या धर्तीवर पायऱ्या करण्याचा अंतर्भाव त्या डिज़ाइनमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे भुशी डॅम, भुशी डॅम म्हणत फुकटचे श्रेय लाटून स्वतःची पाट थोपटण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणी करू नये, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

Shivendrasingh-raje

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, कास धरण उंची वाढवण्याचे काम अजितदादा यांच्यामुळे मंजूरही झाले, त्याला प्रशासकीय, तांत्रिक मंजुरी मिळाली आणि त्यांच्यामुळेच एकदा नव्हे तर दोनदा निधीही मिळाला. त्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला, हे सातारकरांना चांगलेच माहिती आहे. या प्रकल्पाचे काम अशोका स्थापत्य या ठेकेदाराला मिळाले. जसे डिजाईन होते तसे काम या ठेकेदाराने केले, मंजूर असलेल्या डिज़ाइननुसार भुशी डॅम पद्धतीने सांडवा तयार करण्यात आला. त्यामुळे यामध्ये ठेकेदाराने वेगळे असे काही केलेलं नाही. केलेल्या कामाचे पैसे त्याने घेतले आहेत त्यामुळे याबद्दल या ठेकेदाराचे किंवा अन्य कोणाचे आभार मानण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे भुशी डॅमच्या नावाखाली श्रेय लाटण्याचा खोडसाळपणा कोणीही करू नये, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

कास तलाव हा सुरुवातीपासूनच एक पर्यटनस्थळ म्हणून गणला गेला आहे. त्यामुळेच या प्रकल्पाचे काम करताना पर्यटनवाढ डोळ्यासमोर ठेवूनच या प्रकल्पाचे डिजाईन तयार करण्यात आले होते. त्यामुळे भुशी डॅम ‘टच’ रीतसर डिज़ाइननुसार देण्यात आला आहे, कोणाच्या सांगण्यावरून हे केलेले नाही. त्यात वेगळं असं कोणीही काहीही केलेलं नाही. त्यामुळे उगाच फुकटचे श्रेय लाटून सातारकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!